१ नोव्हेंबरपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना प्रवेश नाही
१ नोव्हेंबर पासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर सर्व मालवाहू वाहनांना बंदी घालण्यात येईल. कारसाठी वेग मर्यादा १०० किमी/तास आणि बससाठी ८० किमी/तास आहे.
मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नवीन कनेक्टिंग लिंकवर अवजड आणि हलक्या मालवाहू वाहनांच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक अधिसूचनेनुसार, हा नवीन नियम १ नोव्हेंबर, २०२६ पासून लागू होईल. बोगद्यांची विशेष रचना आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वी 'मिसिंग लिंक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन कनेक्टिंग लिंकवरून आता कोणत्याही प्रकारच्या मालवाहू वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. लहान-मोठे ट्रक, व्यावसायिक पिकअप व्हॅन, टाटा एस (छोटा हत्ती) आणि इतर सर्व मालवाहू वाहनांना या मार्गावरून पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर आणि वाहनांनाही बंदी असेल. या कनेक्टिंग लिंकवरून बंदी घातलेली सर्व मालवाहू वाहने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा जुना (मूळ) मार्ग वापरतील.
कनेक्टिंग लिंकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहनांचे प्रकार आणि वेगमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहे. खाजगी कार, जीप आणि प्रवासी हलकी मोटार वाहने हा मार्ग वापरू शकतात. तथापि, त्यांची कमाल वेगमर्यादा ताशी १०० किमी निश्चित करण्यात आली आहे. तसेच प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांना या मार्गावरून धावण्याची परवानगी असेल. कमाल वेगमर्यादा ताशी ८० किमी आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक अखंडित ठेवण्यासाठी मालवाहू वाहने वेगळी करण्याचा हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

