गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (07:40 IST)

राज्यपाल कोश्यारींनी लिहिले अमित शहांना पत्र; काय लिहिलं आहे त्यात?

bhagat sing koshyari
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप निवळलेला नाही. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमि
यांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानजनक विधान केल्याचा आरोप करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनीही कोश्यारींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता कोश्यारी यांनी अमित शहांना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे.
 
अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणतात की, माझ्या भाषणातील एक छोटा भाग काढून काही लोकांनी भांडवल केलं. मी शिकत असताना विद्यार्थी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेतच मात्र तरुण पिढी सध्याच्या काळातीलही काही आदर्श मानत असतेच. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात, असं विधान मी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आदर्श समोर असू शकतो. पण याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणं, असा होत नाही. माझ्या भाषणामध्ये तुलना करणे हा विषय नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आदर्श आहेत, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहेत.
 
पत्रात ते पुढे म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी केलेल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला आहे. महापुरुषांच्या अवमानाची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. मी माझ्या भाषणामधून वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला होता. अशा व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अवमान केला असे म्हणता येणार नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
 
शिवाजी महाराजांची तुलना गडकरींशी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. तेव्हा कोश्यारी म्हणाले होते की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील. राज्यपालांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण निर्माण झाला आहे. तेव्हापासून त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor