गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (08:21 IST)

खासदार संजय राऊतांनी उलगडली त्यांच्या अटकेची पडद्यामागची भाजपची स्क्रिप्ट

sanjay raut
राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण तापलेलं आहे. आता राज्यपालांच्या या मुद्द्यावरुन जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
संजय राऊत यांनी नुकताच मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राची जनता शिवरायांचा अपमान अजिबात सहन करणार नाही, दोन दिवसात याबाबतचं पुढचं पाऊल काय असेल हे सांगितलं जाईल. राऊत यांनी याप्रसंगी त्यांच्या अटकेमागेही अशीच एक स्क्रिप्ट लिहिली गेली होती, असा आरोपदेखील केला आहे. “प्रत्येकवेळी कोणत्याही तरी वादग्रस्त विधानावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून स्क्रिप्ट लिहिली जात असते. यांचं सारं काही स्क्रिप्टेड असतं. मुंबईतून गुजराती, मारवाडी गेले तर हे शहर देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, मराठी माणसांना कुणी विचारणार नाही असं विधान याआधी याच राज्यपालांनी केलं होतं. त्यावेळी त्यावरुन जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतला अटक केली गेली”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
 
तर महाराष्ट्रालाही विकतील..
संजय राऊत यांनी यावेळी शिंदे सरकारवर टीका करताना राज्यातील खोके सरकार दिल्लीवरुन खोके आले तर हे महाराष्ट्रालाही विकतील असा घणाघात केला आहे. “दिल्लीहून खोके आले तर महाराष्ट्राला विकतील, असं हे खोके सरकार आहे. त्यांना काही राज्याची पडलेली नाही. ते गुवाहटीला जाऊ द्यात, लंकेला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला जाऊ द्यात महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयातून स्थान संपलंय. जनतेनं त्यांचं नाव केव्हाच आपल्या हृदयातून पुसून टाकलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
 
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिली स्क्रिप्ट..
सांगली जिल्ह्यातील जत गावावर दावा करुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर हल्ला केला आहे. यामागे मोठं षडयंत्र आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमावादावर विधान करण्याचं स्क्रिप्ट लिहून दिलं गेलं आहे. पण शिवाजी महाराजांचा जो अपमान झाला आहे तो आम्ही विसरणार नाही. सरकार विरोधात संतापाची लाट आहे. राहिला प्रश्न सीमावादाचा तर महाराष्ट्राची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. त्यासाठी पुन्हा महाभारत घडलं तरी चालेल. त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना सज्ज आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor