शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (10:35 IST)

महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातमध्ये म्युकरमायकोसिसचा कहर

मागील काही महिन्यांमध्ये राज्यात कोविड-१९ आजारातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात पाच हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने या आजाराला ‘अधिसूचित रोग’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या उपचारात अनेक इस्पितळ व आरोग्य सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून अत्याधिक पैसे घेत असल्याचे तक्रारीत मिळाल्यानंतर राज्य सरकारने काही मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहेत.
 
मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्थान अधिनियम 1950 (बीपीटी कायदा) अंतर्गत चालविले जात असलेल्या धर्मादाय इस्पितळ, ज्यात सुश्रुतागृह, प्रसूतिगृह, दवाखाने व वैद्यकीय सहाय्यासाठी असणारे कोणतेही केंद्र यांचा समावेश असून, यांना आपल्या एकूण बेडच्या संख्येचे 10 टक्के बेड हे आरक्षित ठेवावे लागतील आणि या रुग्णांना मोफत सेवा पुरवावी लागेल. त्याचप्रमाणे अतिरिक्त दहा टक्के आरक्षित बेड हे दुर्बल घटकांसाठी असेल व त्यांच्यावर सवलतीच्या दरात उपचार करावे लागतील.
 
केंद्र सरकारने महाराष्ट्राला ११ ते ३१ मे या दरम्यान म्युकरमायकोसिससाठीच्या इंजेक्शन कुप्या दिल्या असून महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातेत म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याची माहिती केंद्राचे सहायक महाधिवक्ता अनिल सिंह यांनी गुरुवारी औरंगाबाद खंडपीठात दिली. सध्याच्या औषध कंपन्यांसह हैदराबाद येथील हाफकीन आणि एका कंपनीला परवाना दिला आहे, अशीही माहिती खंडपीठाला देण्यात आली. या संदर्भातील पुढील सुनावणी मुंबई येथे ८ जूनला तर औरंगाबाद खंडपीठात १० जूनला होणार आहे. 
 
म्युकरमायोसिसच्या किती रुग्णांवर २ ते ९ जून दरम्यान उपचार करण्यात आले, किती बरे झाले, किती दगावले, या रुग्णांच्या उपचारासाठी दररोज किती इंजेक्शनचा पुरवठा झाला याची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे निर्देशही औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी बुधवारी मुख्य सरकारी वकिलांना दिले. या सुनावणीदरम्यान, न्यायमित्र अॅ ड. सत्यजित बोरा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, प्रत्येक रुग्णाला दररोज ४ ते ५ इंजेक्शनची आवश्यकता असताना केवळ एक अथवा २ इंजेक्शन दिली जात आहेत. आवश्यकतेपेक्षा ७० टक्के कमी पुरवठा केला गेला. अपूर्ण पुरवठय़ामुळे मराठवाडय़ातील रुग्णांवर पुरेसे उपचार केले जात नाहीत. परिणामी १२४ रुग्णांचा मृत्यू झाला. याकडे त्यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. तर मागील २० दिवसांपासून म्युकर मायोसिसच्या ६६९ रुग्णांवर उपचार करण्यात येत असून ३८५ रुग्ण बरे झाले आणि १२४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्य सरकारी वकील डी. आर . काळे यांनी खंडपीठास दिली.