मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (21:26 IST)

अजित पवार आणि भाजपचे 'मैत्रीपूर्ण' संबंध संपुष्टात आलेत का?

प्राजक्ता पोळ
1 जुलैला साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन आणि इमारत ईडीकडून जप्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 65 कोटी 75 लाख रूपये मालमत्ता जप्तीची मोठी कारवाई ईडीकडून करण्यात आली.
 
2010 मध्ये या कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात नियमांचं पालन झालं नसल्याचा ईडीचा दावा आहे. या कारखान्याचा व्यवहार ज्यावेळी झाला, त्यावेळी अजित पवार हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे आता ईडीचा तपास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
30 जून 2021 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचं सांगितलं. या पत्रात त्यांनी सचिन वाझे प्रकरण आणि इतर संदर्भ देऊन अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासह अजित पवार यांचंही नाव घेतलं. चौकशीची मागणीसुद्धा केली.
 
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणाचा तपास ईडीकडून गेली दोन वर्षं सुरू असला तरी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रानंतर ईडीची झालेली कारवाई ही संशयाला जागा निर्माण करणारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही महिन्यांपासून अजित पवारांवर सतत टीका करणाऱ्या भाजपचे आणि अजित पवारांचे मैत्रीपूर्ण संबंध आता संपुष्टात आलेत का हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
 

काय आहे प्रकरण?
2010 मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा व्यवहार झाला होता. हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने लिलाव करून 'गुरू कमॉडिटीज् सर्विसेस आणि प्रायव्हेट लिमिटेडला' विकला. या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन झालं नाही, असा आरोप आहे.
 
बाजारभावापेक्षा कमी किंमतीत या साखर कारखान्याचा व्यवहार झाल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. हा व्यवहार झाला तेव्हा महाराष्ट्र राज्य बँकेचे अध्यक्ष अजित पवार होते.
 
त्याचबरोबर या कारखान्याच्या खरेदीसाठी स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून पैसा आल्याचा ईडीचा संशय आहे. ही कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित असल्याचं ईडीकडून सांगण्यात आले आहे.
 

पहाटेचा शपथविधी ते पश्चाताप?
2019च्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन होणार अशी चिन्हे दिसत होती. त्याचवेळी 23 नोव्हेंबर 2019 चा दिवस राजकीय भूकंपाने सुरू झाला. भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
 
पण त्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर असलेले आमदार शरद पवारांकडे परत आले आणि 80 तासांत फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार पडलं. त्यानंतर अजित पवारही स्वगृही परतले.
 
महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. या सर्व घडामोडींदरम्यान अजित पवारांनी भाजपवर टीका करणं टाळलं तर भाजपने अजित पवारांवर.
 
जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर याबाबत सांगतात, "संख्याबळ मिळवण्यासाठी त्यावेळी भाजपने सोईचं राजकारण केलं. अजित पवारांना बरोबर घेतलं. त्यासाठी अजित पवारांच्या काही केसेस मागे घेतल्या गेल्या. हे करूनही भाजपच्या हाती काहीच लागलं नाही. सत्ता मिळाली नाही. अजित पवार परत गेले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीही झाले."
 
पण महाविकास आघाडी सरकारचे जसे दिवस पुढे सरकत गेले तसे राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले. महाविकास आघाडीला दीड वर्ष उलटून गेल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबरोबर केलेल्या सत्तास्थापनेचा पश्चाताप झाल्याचं वक्तव्य केलं.
 
अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापन केल्याचा निर्णय चुकीचाच होता असं फडणवीस म्हणाले. दीड वर्षांनंतर पहिल्यांदा फडणवीसांनी 'त्या' शपथविधीवर भाष्य केलं.
 
जेष्ठ पत्रकार दिपक भातुसे याबाबत सांगतात, "भाजपबरोबरचे अजित पवारांचे मैत्रीचे संबंध पूर्वीच संपले होते, पण संधी आली तर राष्ट्रवादी आणि भाजप हे गणित जुळू शकेल अशी चर्चा भाजपच्या गोटात होती. त्यामुळे भाजप अजित पवारांवर आक्रमकपणे बोलत नसावी. आता तो मार्ग बंद झाला असावा म्हणून कदाचित भाजप आक्रमक झाल्याची शक्यता आहे."
 

चंद्रकांत पाटील विरूद्ध अजित पवार?
'ठाकरे सरकार झोपेत असतानाचं पडेल!' असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महिन्याभरापूर्वी केलं होतं. याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले होते, "सरकार जाणार हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागेपणी की झोपेत केलं होतं? हे तपासावं लागेल. हे सरकार आल्यापासून त्यांना बोचणी लागली आहे."
 
याला लगेच चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत, अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली होती.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, "या नेत्यांना आपण काल काय केलं याची आठवण नाही. ज्याचं सरकार त्याच्याबरोबर आम्ही जाणार हे यांचं तत्व... अजितदादा सांभाळून बोला. आम्ही फाटके आहोत. आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल."
 
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अनेक दिवस सुरू आहेत. चंद्रकांत पाटील यांनी अमित शहांना पत्र लिहील्यानंतरही त्यांनी अजित पवार यांना आव्हान केलं.
 
ते म्हणाले, "हे फक्त पत्र आहे. यापुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. जे अनिल देशमुख यांचं झालं, तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका." असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला.
 

मी वाटच बघतोय ते सरकार कधी कोसळवतात - अजित पवार
महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल या चंद्रकांत पाटील यांच्या भाकितावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी "मी वाटच बघतोय की सरकार कधी कोसळवतात," असं मिश्किलपणे म्हटलं होतं.
 
महाविकास आघाडीचं हे सरकार कधीही कोसळू शकतं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,
 
"अरे बाप रे, लोक झोपेत असताना! ते (चंद्रकांत पाटील) म्हणाले होते की, अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये. मी जर बोलायला लागलो तर फटकळ आहे, अमकं आहे तमकं आहे. कशाला उगीच त्यांच्या नादाला लागायचं. आपलं बरं आहे दुरून डोंगर साजरा."
 
पण पत्रकारांनी पुन्हा त्यांना तोच प्रश्न विचारल्यावर मात्र मिश्किलपणे अजित पवार म्हणाले होते,
 
"मी वाटच बघतोय ते कधी सरकार कोसळवतात. मी सारखं झोपेतून जागा होतो. अरे पडलं की काय सरकार? लगेच टीव्ही लावतो, हे चॅनेल लाव, ते चॅनेल लावं. पडलं, पडलं, पडलं. मी किती वेळा सांगितलं की हे तीन नेते एकत्र आहे तोपर्यंत कुणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही. समजलं?"
 
याबाबत जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर पुढे सांगतात, "ईडीचा तपास योग्य दिशेने झाला पाहीजे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहीजे. पण आता अजित पवार यांना ईडीची नोटीस पाठवणं यात राजकीय संशय येतो आहे. प्रत्येकवेळी योगायोग कसा असू शकतो? काही गोष्टी या उघड आहेत. त्यामुळे आता ही ईडीची कारवाई का होतेय हे काही दिवसांत राजकीय घडामोडींमधून उघड होईलं."त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असेल.