शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (18:09 IST)

HSC : बारावी निकालाचे निकष जाहीर, 30:30:40 फॉर्म्युलानुसार जाहीर होणार निकाल

एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 याच फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
 
दहावीचे 30% गुण, अकरावीचे 30% गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40% गुण या आधारावर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.
 
सीबीएसईप्रमाणे एचएससी बोर्डानेसुद्धा 30:30:40 हा फॉर्म्युला निश्चित केल्याने दोन गोष्टी साध्य होणार आहेत.
 
पहिलं म्हणजे या मूल्यांकन पद्धतीला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता असल्याने एचएससी बोर्डाचा कायदेशीर मार्ग सुकर झाला आहे.
 
दुसरी बाब म्हणजे पदवी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या दोन बोर्डांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे त्यांची मूल्यांकन पद्धती एकसमान राखली आहे.
 
मूल्यमापनाचा तपशील
 
* दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)
* 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)
* 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (30%)
 

विद्यार्थ्यांचा गोंधळ का उडाला आहे?
या परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आणि गोंधळाचे वातावरण आहे. कारण मोठ्या संख्येने कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या इंटरनल परीक्षा आणि प्रात्यक्षिकं झालेली नाहीत. तेव्हा या मूल्यांकन पद्धतीनुसार बारावीचे 40% गुण कशाच्या आधारावर देणार असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
 

"अकरावी आणि बारावीत अनेक महाविद्यालयांनी परीक्षाच घेतलेल्या नाहीत. माझ्या कॉलेजमध्ये बारावीत एकही परीक्षा झालेली नाही. अंतर्गत परीक्षांसाठी आता धावपळ सुरू आहे. काही कॉलेजमध्ये ऑनलाईन परीक्षा किंवा असाईनमेंट्स देऊन विद्यार्थ्यांना गुण दिले जात आहेत. तेव्हा बारावीचे अंतिम मूल्यमापन करताना असे गुण ग्राह्य धरणार का," असा प्रश्न एचएससी बोर्डाची विद्यार्थिनी सुजाता अंगराखे हीने बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केला.
 

"काही कॉलेज विद्यार्थ्यांना आता अंतर्गत परीक्षा द्यायला सांगत आहेत. काही ठिकाणी 30 गुणांची ऑनलाईन परीक्षा होत आहे तर काही कॉलेजने असाईनमेंट्स दिल्या आहेत," असंही सुजाताने सांगितलं.
 
महाविद्यालयीन स्तरावर सर्व गुण दिले जाणार असल्याने पक्षपात होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.
 
बोर्डाची विद्यार्थिनी सलोनी कांबळी सांगते, "सीबीएसई बोर्डाशी एचएससी बोर्डाने तुलना करू नये. कारण एचएससी बोर्डाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वर्षभर अंतर्गत परीक्षा झाल्या नाहीत. आता मुख्य परीक्षा रद्द झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे नि:पक्षपातीपणे गुण दिले जाणार नाहीत याचीही शक्यता आहे.
 

महाविद्यालयीन प्रवेशासाठी सीईटी होणार?
बारावीचा निकाल आणि महाविद्यालयीन प्रवेश या दोन गोष्टी दोन वेगळे विभाग सांभाळतात हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
 
बारावीच्या निकालासंदर्भात शालेय शिक्षण विभाग आणि एचएससी बोर्ड निर्णय घेत असते. पण बारावीनंतरचे सर्व प्रवेश, परीक्षा आणि निकाल विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येतात. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाला तरी पदवी आणि इतर प्रवेश याच निकालाच्या आधारे होतील असं निश्चित सांगता येणार नाही.
 
वैद्यकीय, इंजिनिअरिंग, व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असतात. परंतु यंदा बीए, बीएससी, बीकॉम, बीएमएस, बीएफएफ अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही सीईटी घेतली जाऊ शकते.
 
मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यपकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "पदवी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होणं गरजेचं आहे. कारण कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यमापन पारदर्शी असेलच असं नाही. तसंच विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले गेले तर प्रवेशासाठी स्पर्धा प्रचंड वाढणार आहे. हे विद्यार्थ्यांसाठीही योग्य ठरणार नाही. शिवाय, महाविद्यालयात उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखता येणार नाही."
 
बारावीत सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला तर प्रवेशावेळी महाविद्यालयांच्या अडचणी वाढणार आहेत. मेरिटनुसारच प्रवेश व्हावेत यासाठी महाविद्यालयं आग्रही आहेत.
 
महाविद्यालयीन प्रवेशासाठी सीईटी घेणार की नाही याबाबत उच्च शिक्षण विभागाकडून कोणतीही बाब स्पष्ट करण्यात आलेली नाही.