शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (11:55 IST)

हातकणंगले लोकसभा : राजू शेट्टींसाठी खासदारकी किती सोपी? मतदारसंघात सध्या काय सुरू आहे?

raju shetty
हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा कृष्णा पंचगंगेचा ऊसपट्टा या मतदारसंघाचा प्रमुख भाग. अनेक वर्ष कॉंग्रेस अन् पुढे राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केलं. विशेषतः बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने. या माने घराण्याने हातकणंगले लोकसभा वेळोवेळी जिंकली.
 
या ऊसपट्ट्याच्या मतदारसंघाला राष्ट्रीय ओळख मात्र मिळाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी मिळवलेल्या अनपेक्षित विजयामुळे. कोणताही आर्थिक वा राजकीय पाठिंबा नसताना साखर सम्राटांच्या या बालेकिल्ल्याला राजू शेट्टी यांनी दोन वेळा हादरा दिला आणि शेतकऱ्यांची ताकद संसदेत पोहचवली. मात्र याच राजू शेट्टी यांचा झंझावात गेल्या निवडणुकीत निष्प्रभ ठरला. हे कसं घडलं? काय आहेत या गुंतागुंतीच्या मतदारसंघातील राजकीय गणितं? जाणून घेऊ या लेखातून.
 
तर हातकणंगले मतदारसंघ हा तसा काँग्रेसच्या विचारधारेचा म्हणता येईल. म्हणजे 1977 ते 1991 अशा पाच टर्म काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी इथूनच बाजी मारली होती. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला. पुढे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा बाळासाहेब माने यांची सून निवेदिता माने दोनदा खासदार झाल्या. 2009 साली राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून येथून दणदणीत विजय मिळवला. पुढे 2014 च्या निवडणूक जागावाटपात 'राष्ट्रवादी'ने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला दिला. त्याही वेळी शेट्टी यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली.
 
2019 च्या निवडणुकीवेळी काय घडलं?
या मतदारसंघात जैन समाजाचं सुमारे दीड लाख मतदान आहे. त्या पाठिंब्यासह राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मते मोठ्या प्रमाणावर मिळवत आपले बस्तान बसवले होते. प्रामाणिक प्रतिमा असलेल्या शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारं पाठबळ कायम होतं. याला खिंडार पाडण्यासाठी त्या काळात शेट्टींविरोधात आक्रमक जातीय प्रचार सुरू झाला. शिवाय स्वतः राजू शेट्टी यांनी ब्राह्मण वर्गाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य त्यांनाच भोवलं,असं म्हटलं जातं.
 
थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख मिळवली होती. त्यामुळं त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठिशी उभी केली. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला होता. त्याविरोधात धैर्यशील माने हे शेतकरी, तरुण, व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या रिंगणात उतरले. राजू शेट्टी यांना इचलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास या मुद्द्यावर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याने माने यांना शहरात लोकप्रियता मिळत गेली. शिवाय सेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रचाराची राळ उठवली. त्याला भाजपचे पाठबळ आणि मराठा मोर्चाची पार्श्वभूमी लाभल्याने धैर्यशील माने यांनी मैदान मारले.
 
राजू शेट्टी स्वबळावर लढणार?
कोल्हापूर लोकसभा हातकणंगले मतदारसंघ हा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. 2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या पाठिंब्यावर लढत असलेले राजू शेट्टी यंदा देखील लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. शेट्टी यांनी इंडिया वा मविआने आमच्याकडे चर्चेला येऊ नये, आम्ही त्यांच्या दारी जाणार नाही असं म्हटलं होतं. आणि नंतर लगेच दोन दिवसात शेट्टींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट अराजकीय असल्याचे शेट्टी म्हणत असले तरी त्यांचं राजकारण लपून राहिलेलं नाही. शिवसेनेच्या कोट्यातून शेट्टी यांना उमेदवारी देऊन गेल्या वेळच्या चुकीची दुरुस्ती करण्याची रणनीती आहे. त्यामुळे राजू शेट्टी ही निवडणूक महाविकास आघाडी कडून लढवणार का? की स्वबळावर लढणार हे स्पष्ट होत नाहीये.
 
उमेदवार शोधण्यासाठी महाविकास आघाडीची कसरत...
एका बाजूला राजू शेट्टी यांचा निर्णय संभ्रम निर्माण करणारा असला तरी दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने शिंदे गटासोबत गेल्याने महाविकास आघाडी कडून उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी पुन्हा मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. ज्यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठक झाली तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. जरी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असली तरी जयंत पाटील यांची देखील इच्छा असल्याचं बोललं जातंय. जयंत पाटील यांची इस्लामपूर, शिराळा आणि हातकणंगलेमध्ये असलेल्या राजकीय ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्या मागे उभी राहिली तर जयंत पाटलांना मुलाला लॉन्च करण्याचा प्रयत्नांना यश मिळणार आहे.
 
महायुतीचा उमेदवार कोण?
सध्या या मतदारसंघात ठाकरेंशी बंडखोरी करत शिंदेचा हात पकडलेले खासदार धैर्यशील माने यांनाच 2024 ची उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा महायुतीमध्ये सुरू आहे. मात्र पाच वर्षानंतरही इचलकरंजीत पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास हे दोन्ही प्रश्न पूर्वीसारखेच आ वासून उभे असल्याने नाराजीचे बुमरँग होऊ शकते. लॉजिस्टिक पार्क, शाहूवाडीतील औद्योगिक वसाहतीबाबत कोणती भरीव प्रगती केली हेही माने यांना पटवून द्यावं लागणार आहे. एकीकडे भाजपने बॅकअप प्लॅन म्हणून महायुतीची ताकद वाढवण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप हा ऐन वेळेला मोठा धमाका करू शकतो हा आजपर्यंतचा त्यांच्या राजकारणाचा इतिहास आहे. सध्याचं चित्र पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने लढत देणार हे उघड आहे. त्यांच्या बरोबरीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, शाहूवाडी तालुक्यातून काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड अशी मात्तबर नावं उमेदवारीसाठी पुढे येत आहेत.
 
Published By- Dhanashri Naik