शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , गुरूवार, 22 जुलै 2021 (08:31 IST)

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच

आगामी पाच ते सहा दिवस मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात अती पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचा समावेश आहे. अती पावसाचा इशारा देण्यासाठी हवामान विभागाच्या वतीने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात येतो. म्हणजे या भागामध्ये अती पाऊस पडण्याची शक्यता असते.
 
मराठवाड्यात गेल्या महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र, उशीरा का होईना मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, आता पुन्हा अती पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वी देखील मराठवाड्यातील काही भागात अती पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
अति पावसाचा इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये २२ जुलै रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच औरंगाबाद विभागात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे.