ठाकरे-शिंदेच्या भवितव्याचा बुधवारी ऐतिहासिक फैसला
सत्ता आणि शिवसेनेवरील वर्चस्वासाठी गेले दीड वर्ष सुरू असलेल्या उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा फैसला बुधवारी होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निर्णय देणार असून या निर्णयावर शिंदे यांचे व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भवितव्य ठरणार आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झालेल्या नार्वेकर व मुख्यमंत्र्यांमधील गुप्त भेटीबद्दल जोरदार आक्षेप घेताना देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवणारा निकाल असेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली तर लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते व आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
जून 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ होऊन सत्तातर झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. सत्तेबरोबरच शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्हही ठाकरेंकडून हिसकावून घेतले. तेव्हापासून शिवसेनेच्या दोन गटांत घमासान संघर्ष सुरू आहे. एक वर्ष सर्वोच्च न्यायालयात लढाई झाल्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती. या लढाईचा फैसला बुधवारी दुपारी होणार आहे.
ठाकरे गटाचा दावा मान्य झाला व पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल. शिंदे अपात्र ठरणारच नाहीत व ठरले तरी तेच मुख्यमंत्री राहतील. त्यांना विधान परिषदेवर निवडून आणू, असे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे तरीही हे सोपे नाही. त्यामुळे विजयाची खात्री असूनही शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सोबत उरलेल्या आमदारांपैकी आदित्य ठाकरे वगळता उर्वरित 14 जणांविरुद्ध शिंदे गटाने अपात्रता याचिका दाखल केली आहे. ते अपात्र ठरणार का? हाही कळीचा मुद्दा असणार आहे. तसे झाल्यास गेले दीड वर्ष संघर्ष करणा-या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल; पण त्याची सहानुभूतीही मिळणार आहे.
दोन्हीपैकी कोणाच्या आमदारांवर अपात्रतेची कु-हाड कोसळणार की, ही फूट नव्हे तर बहुसंख्य आमदारांनी केलेला नेतृत्वबदल आहे, असा मध्यम मार्ग काढून दोन्ही बाजूच्या आमदारांना अभय मिळणार या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. निकालाबाबत शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून परस्परविरोधी दावे केले जात असले तरी यामुळे राज्यातले राजकीय वातावरण मात्र तापले आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor