गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (23:12 IST)

बिपरजॉय चक्रीवादळ कुठपर्यंत पोहोचलं?

अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र रुप धारण करत आहे. हे वादळ येत्या काही दिवसांत गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी वादळाविषयी ताजी माहिती शेअर करताना सांगितले की, बिपरजॉय वादळ उत्तरेकडे सरकत आहे.
 
वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने गुजरातच्या किनारी भागातील मच्छिमारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
 
त्यानुसार मच्छिमारांना 13 तारखेपर्यंत मध्य अरबी समुद्र आणि 15 तारखेपर्यंत उत्तर अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय मुंबईपासून 630 किमी, तर पोरबंदरपासून 620 किमी अंतरावर आहे.
 
अरबी समुद्रात आलेले हे या वर्षातील पहिलं वादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात मोखा नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि नंतर त्याचंही तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं होतं.
 
दरम्यान, बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण आणि गोवा किनारपट्टीलगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
 
वादळ किती वेगानं पुढं सरकतंय?
6 जून रोजी समुद्रात निर्माण झालेलं हे वादळ झपाट्यानं पुढं सरकत आहे. ते अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं धोकादायक होत चालल्याचं दिसत आहे. 7 तारखेला त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं.
 
8 तारखेच्या सकाळी, हे वादळ पोरबंदरपासून 965 किमी आणि मुंबईपासून 930 किमी अंतरावर होतं.
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आठ जूनच्या सकाळपर्यंत हे वादळ ताशी 40 किलोमीटर वेगानं पुढं सरकत आहे. असं असलं तरी त्याच्या प्रगतीचा दर सतत बदलत आहे. कधीकधी ते ताशी 3 किमी ते 9 किमी वेगानं पुढं जात आहे.
 
हवामान खात्यानुसार, हे वादळ सध्या समुद्रात पुढे सरकत असून ते आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. पण, ते नेमके कुठे धडकेल, याची कोणतीही माहिती हवामान विभागानं दिलेली नाही.
 
सध्या या वादळाच्या वाऱ्याचा वेग 150 ते 155 किमी प्रतितास झाला असून 9 जूनपर्यंत तो 170 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे.
 
अरबी समुद्राचे तापमान सध्या 30 ते 32 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे हे वादळ आणखी तीव्र होत असून 12 जूनपर्यंत ते तसंच राहण्याची शक्यता आहे.
 
महाराष्ट्रात हे वादळ कधी येणार?
हे वादळ कुठे धडकणार याबाबत हवामान खात्याने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
दरम्यान, 11 जूनच्या आसपास परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अहवालानुसार, मान्सूनपूर्व तयार होणारी चक्रीवादळे त्यांचा मार्ग बदलू शकतात. तसंच या वादळाचा नेमका मार्ग आधीच ठरवणं फार कठीण काम आहे.
 
हे वादळ 12 तास थेट उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
 


Published By- Priya Dixit