शंभर वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत देखील होती पंढरीत अघोषित बंदी
श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर प्रथमच भक्तांना बंद
वैकुंठाचा राणा, वारकर्यांचा लाडका विठुराया खरे तर भक्तांसाठी पंढरीत उभा असल्याचे मानले जाते. असा देव व याचा सोहळा जगात कोठेच नाही असे संतांनी वर्णन केले आहे. यामुळे कोणतेही भौतिक साधन, यज्ञ, याग, व्रत यापेक्षा पांडुरंगाला आपल्या लाडक्या भाविकांची आस अधिक आहे. मात्र, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आजपर्यंत झाले नाही ते झाले. विठुरायाचे राऊळ भक्तांसाठीच बंद करण्यात आले.
100 वर्षांपूर्वी भीषण अशा प्लेगच्या साथीत संपूर्ण पंढरपूरकर गाव सोडून गेले होते. त्यावेळी देखील इंग्रज सरकारने दर्शनास बंदी आणली नव्हती. परंतु साथीच्या आजाराने भाविकांनीच अघोषित दर्शनबंदी केली होती. मात्र इतिहासात प्रथमच सरकारने विठुरायाचे दर्शन बंद ठेवून ही परंपरा खंडित केली. परंतु जनतेच्या भल्लयासाठी भाविकांनी हा निर्णय स्वीकारावा. अठ्ठावीस युगापासून पंढरीचा विठुराया भक्तांसाठी एका विटेवर उभा आहे. या मंदिराचा व देवाचा कार्यकाळ कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही, यावरूनच याचे प्राचीनत्व सिध्द होते. यामुळे इतर देवस्थानपेक्षा पांडुरंग व याचा भक्त वेगळा ठरतो. देवाचे व भक्ताचे असे नाते क्वचितच पाहावास मिळते. हे नाते आजपर्यंत अतुट होते. इतिहासातील विविध दाखले पाहिले असता अनेक महापूर, साथीचे रोग, इंग्रजांची बंदी असताना देखील पांडुरंगाचे मंदिर अथवा दर्शन कधीच बंद नव्हते.
1865 साली कॉलराची साथ पसरली होती. त्यावेळी पंढरी अशीच रिकामी झाली होती. यानंतर 1898 साली आषाढी वारीमध्येच मोठा पूर आला होता. मंदिरापर्यंत पाणी आले नसले तरी आताच्या कालिका देवी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाण्यामुळे खासगीवाले यांचा एकादशीला काढण्यात येणारा रथ देखील कालिका देवी चौकातून माघारी आणला गेला. तर 1918 साली देशात सर्वात मोठी प्लेगची साथ पसरली होती. त्याळी अख्खे पंढरपूर ग्रामीण भागात, मराठवाड्यात स्थलांतरित झाले होते. त्यावेळी खर्या अर्थाने पंढरीचे मंदिर अघोषित बंद होते. इंग्रजांनी कायदा करून मंदिर बंद ठेवले नसले तरी प्लेगच्या साथीने संपूर्ण राज्याला ग्रासले होते. यामुळे विठुरायाचे मंदिरच का संपूर्ण पंढरपूरच ओस पडले होते. मात्र अशा बिकट साथीच्या आजारात देखील त्यावेळी मंदिरातील बडवे, उत्पात व सेवाधारी यांनी देवाचे सर्व नित्योपचार सुरूच ठेवले होते. केवळ नित्योपचारापुरते मंदिर उघडले जात होते. या नंतर 1946 साली पुन्हा प्लेगच्या साथीत असेच गाव रिकामे झाले होते. तर 1956 साली शहरात आलेल्या महापुरामुळे गावात येण्याचा संपर्कच तुटला होता. 56चा महापूर आजर्पंतचा सर्वात मोठा मानला जातो. त्यावेळी तीन दिवस गावात पाणी होते. संत नामदेव पायरीजवळ ते आले होते. गावाला पाण्याचा वेढा असल्याने भाविक शहरात येऊ शकले नाहीत. तसेच इंग्रजांनी देखील साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वारीवर बंदी आणली होती. मात्र भाविकांनी ती झुगारून लावल्याने अखेर ती बंदी उठविण्यात आली होती.
मागील हा इतिहास पाहिला असता भक्तविना पांडुरंग कधीच विटेवर उभा नव्हता. मात्र इतिहासात प्रथमच सरकारला सर्वसंमतीने दर्शनबंदी करावी लागली आहे.