बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (11:21 IST)

बीफबद्दलच्या दोन वर्षांपूर्वीच्या पोस्टसाठी प्राध्यापकाला अटक

बीफबद्दलच्या दोन वर्षांपूर्वीच्या पोस्टसाठी एका प्राध्यापकांना झारखंड पोलिसांनी अटक केली आहे. जमशेदपूरमधील आदिवासी प्राध्यापक आणि रंगकर्मी जीतराई हांसदा असं त्याचं नाव आहे.
 
जीतराई हांसदा जमशेदपूर शहरातील कोऑपरेटिव्ह कॉलेजात शिकवतात. दिल्लीस्थित नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या मोजक्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये हांसदा यांचा समावेश होतो.
 
आदिवासींच्या विस्थापनावर आधारित त्यांनी लिहिलेलं फेव्हिकोल नाटक चांगलंच गाजलं होतं. या नाटकाचे देशभर प्रयोग झाले होते. त्यावेळी या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
 
झारखंड पोलिसांनी हांसदा यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून हांसदा फरार होते. त्यांना घाघीडीह तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे, असं जमशेदपूरच्या साकची ठाण्याचे ऑफिसर राजीव कुमार सिंह यांनी सांगितलं.
 
"जीतराई हांसदा यांच्याविरुद्ध जून 2017मध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सव्वा वर्षांपूर्वी हांसदा यांना फरार घोषित करून त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयाच्या प्रक्रियेत सहभागी होत नव्हते. ते पोलिसांपासून पळ काढत होते. दोन समाजात धार्मिक तेढ पसरवण्याचा तसंच वैमनस्य घडवून आणण्याचा आरोप त्यांच्यावर आह", असं राजीव कुमार सिंह यांनी बीबीसीला सांगितलं.
 
असा झाला गुन्हा दाखल
पोलिसांच्या अहवालानुसार जीतराई हंसदा यांनी 29 मे 2017 रोजी आपल्या फेसबुक वॉलवर बीफ खाण्यासंदर्भात पोस्ट लिहिली होती. या पोस्टमुळे धार्मिक तेढ पसरवण्याची शक्यता होती.
 
यानंतर साकची ठाण्याचे सब इन्स्पेक्टर अनिल कुमार सिंह यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. त्यांनी चार दिवसात तपास पूर्ण केला. 2 जून 2017 रोजी हांसदा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यावेळी ते जमशेदपूर ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ वुमन या ठिकाणी अध्यापनाचं काम करत असत.
 
फेसबुक पोस्ट
सब इन्स्पेक्टर अनिल कुमार सिंह यांच्या रिपोर्टनुसार जीतराई हंसदा यांची फेसबुक पोस्ट अशी होती. आम्ही आदिवासी माणसं बीफ अर्थात गोमांस खातो. जाहेर डांगरी म्हणजे अंत्य संस्कारांच्या वेळी आम्ही वध करतो.
 
सणासुदीच्या वेळी गोमांस खातो. भारताच्या कायद्यासाठी आम्ही आमचं खाणंपिणं, परंपरा बंद करून हिंदू होऊन का राहावं? आदिवासीपण संपवून का टाकावं? हे कधी होऊ शकत नाही. आदिवासींना खऱ्या अर्थाने भारताचा भाग मानत असाल तर आदिवासींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी अशा कायद्यावर बंदी घातली असती.
आता फेसबुक पोस्ट नाही
मात्र आता ही पोस्ट जीतराई हंसदा यांच्या फेसबुक पेजवर दिसत नाही. जीतराई यांनी ही पोस्ट काढून टाकली असावी, असं त्यांच्या पत्नी माही सोरेन यांनी सांगितलं.
 
यासंदर्भात माही सोरेन यांनी बीबीसीला अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या, "आम्हाला वाटलं हे प्रकरण मिटलं आहे. जीतराई आपल्या मित्रांबरोबर असताना त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर अनेक तासांनंतर पोलिसांनी मला याची कल्पना दिली. जीतराई यांच्याशी मी फोनवरून बोलले. त्यानंतर पोलीस ठाण्यात माझी आणि जीतराई यांची भेट झाली. अचानक झालेल्या अटकेने मला धक्काच बसला. रविवार असूनही मॅजिस्ट्रेटच्या समोर जीतराई यांना सादर करण्यात आलं आणि माझ्यासमोरच त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आता आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत".
 
नोकरी सोडावी लागली
या फेसबुक पोस्टनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (एबीव्हीपी) निगडीत विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट कॉलेज फॉर वुमनच्या प्राचार्यांना भेटून जीतराई यांना निलंबित करण्याची मागणी केली.
 
कोल्हान विद्यापीठानं जीतराई यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली. या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी कॉलेज प्रशासनाने त्यांच्या कराराचं नूतनीकरण करण्यास नकार दिला. ऑगस्ट 2017मध्ये कॉलेजने त्यांना कामावरून काढून टाकलं.
 
दरम्यान आदिवासींची प्रमुख संघटना 'माझी परगना महाल'ने कुलपतींना पत्र लिहून जीतराई यांच्याविरुद्ध कारवाई न करण्याची मागणी केली. मात्र विद्यापीठ प्रशासनाने ही मागणी मान्य केली नाही.
 
जीतराई यांनी केवळ आदिवासी परंपरेबद्दल लिहिलं आहे असं संघटनेचं म्हणणं होतं. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या? तेव्हापासून जीतराई रंगभूमीशी निगडीत कामं करत आहेत. आदिवासींच्या हक्कांबद्दल बोलत होते.
 
अटकेचा कट
एक महिन्यापूर्वीच जीतराई यांनी जमशेदपूरमधल्या कोऑपरेटिव्ह कॉलेजात शिकवायला सुरुवात केली होती. ही अटक म्हणजे जीतराई यांच्याविरुद्धचा कट असल्याचं झारखंडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
 
झारखंड भाषा साहित्य संस्कृती आखाड्याच्या महासचिव आणि प्रसिद्ध लेखिका वंदना टेटे यांनी जीतराई यांची बिनशर्त सुटका व्हावी अशी मागणी केली होती.
 
जीतराई यांनी घटनेविरोधात काहीही लिहिलं नाही. संताल संस्कृतीबद्दल गोष्ट सांगणारी पोस्ट लिहिली होती. त्यासाठी त्यांना अटक होणं योग्य नाही, अशी भूमिका वंदना यांनी घेतली.