रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 25 मे 2019 (15:54 IST)

नरेंद्र मोदी: लोकसभा निकाल हे मुस्लीम देशांच्या मीडियात ‘चिंतेचा विषय’

भारताच्या 17व्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये मोदींच्या या विजयाला 'हिंदू राष्ट्रवादी' पक्षाचा विजय म्हणून संबोधलं जात आहे.
 
मुस्लीम देशातल्या मीडियामध्येही मोदींच्या विजयाला महत्त्व देण्यात आलं आहे.
 
अरब न्यूजमध्ये तलमीझ अहमद लिहितात, "मोदींनी पहिल्या 5 वर्षांमध्ये आखाती देशांसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत आणि पुढेही ते कायम राहातील."
 
"भारताची ऊर्जा सुरक्षा आणि विकास आखाती देशांमधल्या तेलाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारत 80 टक्के पेट्रोलियम गरजांची पूर्तता आखाती देशांतून करतो. याशिवाय भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आखाती देशांची गुंतवणूक खूपच महत्त्वाची आहे," असं त्यांनी लिहिलं आहे.
 
"आखाती देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात. यामुळेच मोदी आखाती देशांना महत्त्व देतात. मोदींनी पहिल्या टर्ममध्ये या मुस्लीम देशांचा दौरा केला होता. इतकंच नाही तर संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियानं मोदींना देशातील सर्वोच्च किताब देऊन सन्मानित केलं होतं," असंही या लेखात म्हटलं आहे.
 
"आखाती देशासोबत भारताचे संबंध प्राचीन संस्कृतीपासून आहेत आणि मोदींच्या या विजयानंतर हे संबंध अधिक मजबूत होतील," असंही म्हटलं आहे.
 
'धार्मिक राजकारणात वाढ'
पाकिस्तानच्या मीडियात मोदींच्या विजयाची चर्चा आहेच, पण त्याशिवाय साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विजयालाही महत्त्व देण्यात आलं आहे.
 
पाकिस्तानचं वर्तमानपत्र 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या लेखात म्हटलं आहे, "भारतात मुस्लिमांविरुद्धच्या बॉम्ब हल्ल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळमधून हिंदू राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या तिकिटावर विजय मिळाला आहे. दहशतवादी हल्ल्याचा आरोप असलेली व्यक्ती भारताच्या संसदेत निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ आहे."
 
पाकिस्तानमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र 'डॉन' (Dawn) मध्ये मोदींच्या विजयावर प्रखर टीका करण्यात आली आहे.
 
डॉनच्या संपादकीयात लिहिलंय की, "धार्मिक राजकारणात वाढ होत आहे, हे जपाकिस्तानसोबतची चर्चा पुन्हा सुरू होईल, हीसुद्धा आशा आहे,"गातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीनं दाखवून दिलं आहे. यामुळे लोकशाहीवर त्याचे पडसाद दिसून येतील. मोदी आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत आणि मतदानात त्यांना फटका बसेल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण असं न होता मोदींना निवडणुकीत प्रचंड विजय मिळाला.
 
"या निवडणुकीचा निकाल चकित करणारा आहे, आणि धार्मिक तेढ आणि जातीय राजकारणातून मतदारांवर प्रभाव पाडता येऊ शकतो, हे सांगणारा आहे."
 
"अनेक महिने चाललेल्या प्रचारात मोदींनी मुस्लीम आणि पाकिस्तानविरोधी भूमिकेचा खूप वापर केला. भारतानं पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करून राष्ट्रवादी भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. आता निवडणूक संपली आहे. मोदींनी ज्या हिंदू राष्ट्रवादाचा अतिवापर केला त्याच्यावर आवर घालण्यात येईल, अशी आशा करू या.
 
"यामुळे अल्पसंख्याकांच्या मनातील सुरक्षेची भावना कायम राहील. मोदी हे शांतता आणि विकासासाठी काम करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. पाकिस्तानसोबतची चर्चा पुन्हा सुरू होईल, हीसुद्धा आशा आहे," असंही लिहिलं आहे.
 
मुस्लिमांसाठी निकाल कसा?
पाकिस्तानची न्यूज वेबसाईट 'द न्यूज'मध्ये ज्येष्ठ पत्रकार एजाझ सईद लिहितात, "विरोधी पक्ष आणि 20 कोटी मुस्लिमांसाठी 2014च्या विजयापेक्षा मोदींचा हा विजय अधिक महत्त्वपूर्ण आहे. अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी आंदोलन सुरू होतं, तेव्हासुद्धा भाजपला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता.
 
"या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. पण मोदी 'सबका साथ सबका विकास' या मंत्राला सत्यात उतरवू शकतील का, हा प्रश्न आहे."
 
ते पुढे म्हणतात, "नरेंद्र मोदी या बहुमताच्या आधारावर लोकशाही आणि राज्यघटनेला स्वत:च्या मतानं आकार देतील. गेल्या पाच वर्षांत मोदींवर सर्वोच्च न्यायालय, विद्यापीठं आणि इतर संस्थांना आपल्या हिशोबानं चालवल्याचा आरोप झाला आहे. भारतीय मुस्लिमांच्या मनात विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी या बहुमतानं मोदींवर सोपवली आहे."
 
'गल्फ न्यूज'नं लिहिलं आहे की, "मोदी त्यांच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा अधिक मजबूत पावलं या काळात उचलू शकतील."
 
कतारचं प्रसिद्ध मीडिया नेटवर्क अल्-जझीरानंही मोदींच्या विजयाला प्रामुख्यानं छापलं आहे. त्यात लिहिलं आहे की, "अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाची निवड व्हावी, त्याप्रमाणे भाजपनं संपूर्ण निवडणूक मोहीम चालवली. भाजपच्या अजेंड्यात हिंदुत्वादी राजकारण प्रामुख्यानं होतं.
 
"मोदींचा इतक्या मताधिक्यानं झालेला विजय मुस्लिमांसाठी चिंतेचा विषय आहे, कारण गेल्या पाच वर्षांत कडव्या हिंदुत्ववादी समूहांनी मुस्लिमांवर अनेकदा हल्ले केले आहेत."
 
"कृषी क्षेत्र आणि बेरोजगारीशी संबंधित अनेक प्रश्न असतानाही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपच्या जागाच नाही तर मतांमध्येही 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोदींच्या विजयात राष्ट्रीय सुरक्षा आणि पाकिस्तानसोबतचे बिघडलेले संबंध महत्त्वाचे मुद्दे राहिले."
 
नजम सेठी यांनी 'चॅनेल 24'वरील 'नजम सेठी शो'मध्येम्हटलं की, "निवडणुकीत मोदींनी बालाकोट हल्ल्याचा वारंवार उल्लेख केला आणि भारतीय माध्यमांनीही मोदींना पाठिंबा दिला.
 
"मोदींच्या राज्यात भारत एक सांप्रदायिक देश बनेल आणि तो पाकिस्तानच्या झिया-उल-हल यांच्या राज्यासारखा असेल. भारतात आता उदारमतवादी लोकांना टार्गेट केलं जाईल आणि मुस्लीम गंभीर शोषणाचा सामना करतील.
 
पाकिस्तानच्या सरकारी वाहिनी PTVवरील 'सच तो यही है' या राजकीय कार्यक्रमात राजकीय विश्लेषक इम्तियाज गुल यांनी म्हटलं आहे की, "भारतातल्या सामान्य लोकांनी मोदींना यासाठी पाठिंबा दिला कारण मोदी सामान्य लोकांची भाषा बोलतात."
 
या कार्यक्रमात मारिया सुल्तान यांनी म्हटलं की, "मोदींनी या निवडणुकीत पाकिस्तान विरोधी अनेक वक्तव्यं केली आहेत."