बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 मे 2019 (12:07 IST)

चंद्रपूर लोकसभा निकाल: अशोक चव्हाण यांच्या 'त्या' कॉलने महाराष्ट्र काँग्रेसला जिंकवून दिली एकमेव जागा

महाराष्ट्रात काँग्रेस नेस्तनाबूत झालं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली - चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44,763 मतांनी पराभव केला.
 
अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून हरले.
 
पण चंद्रपूरची जागाही काँग्रेसच्या हातून गेली असती, जर एका फोन कॉलची ऑडियो क्लिप बाहेर आली नसती. त्या एका फोन कॉलनंतर काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला आणि तोच निवडून आला.
 
काय होतं हे प्रकरण?
साधारण 23-24 मार्चची ही गोष्ट, म्हणजे बरोबर दोन महिन्यांपूर्वीची. चंद्रपूरहून राजूरकर नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याचा फोन कॉल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना जातो.
 
राजूरकर म्हणतात, "सर, चंद्रपूर येथून विनायक बांगडे यांना तिकीट जाहीर झालं आहे. चंद्रपूरमधून आपला उमेदवार खात्रीशीर आहे ना."
 
यावर चव्हाण म्हणतात, "तुम्ही जे म्हणताय ते तिकडे मुकूल वासनिकांशी बोलून घ्या. माझं पूर्ण समर्थन आहे, पण काही लोकांना समजत नाही. मी तुमच्याबरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये."
 
राजूरकर: "मुकूल वासनिक काहीच नाही ना सर तुमच्यापुढे. तुम्ही सगळा महाराष्ट्र सांभाळता."
 
चव्हाण: "माझं इथं कुणी ऐकायला तयार नाही. मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे. तुम्ही जरा वासनिकांशी बोला, आमची बाजू मांडा."
 
ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचं चव्हाण यांनी तेव्हा बीबीसीशी बोलताना मान्य केलं होतं.
 
पण राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले होते, "मी कुठंही काही जाहीर भाष्य केलेलं नाही. कार्यकर्त्याच्या भावना समजून घेणं, तिथले विषय समजून घेणं, हे अध्यक्ष म्हणून माझं कामच आहे. कार्यकर्ते फोन करतात, ते काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळेच करतात."
 
"लोकसभा तिकीट वाटपासंदर्भात मी हतबल असण्याचा विषय नाही, पण काही ठिकाणी मतांमध्ये भेद असू शकतात. विदर्भातले विषय मुकूल वासनिकांना माहिती आहेत, म्हणून त्यांच्याशी बोलायचा सल्ला मी कार्यकर्त्याला दिला," असं ते पुढे म्हणाले.
 
मात्र ही क्लिप लीक झाली की जाणीवपूर्वक करण्यात आली, यावर चव्हाणांनी स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं होतं. मात्र त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.
 
या क्लिपची चर्चा राज्यभरात झाली आणि त्यानंतर चंद्रपूरचा उमेदवार बदलण्यात आला. तोच एकटा आता लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेसचं प्रतिनिधित्व करणार आहे.
 
कशी होती चंद्रपूरची लढत?
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपचे हसंराज अहिर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
 
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि सुरेश धानोरकर यांच्यात थेट लढत होणार होती. आतापर्यंत बहुरंगी लढतीत होणारी मतविभागणी हंसराज आहिर यांच्या पथ्यावर पडत होती. यावेळी दुहेरी लढतीचं आव्हान ते कसं पेलतात, याकडे राज्याचं लक्ष असणार होतं.
 
चंद्रपूर मतदारसंघात धर्म आणि जात हे मुद्दे गौण ठरतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत राजकीय आडाख्यांना चकवा देणारी ठरते.
 
हा मतदारसंघ चर्चेत आला तो काँग्रेसने बदललेल्या उमेदवारांमुळे. काँग्रेसने इथून माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल यांना तिकीट दिलं. पण बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवाराला तिकीट का, यावरून वादाला सुरुवात झाल्याने विशाल यांनी माघार घेतली. इथं माजी खासदार नरेश पुगलिया आणि विजय वडेट्टिवार अशा दोन प्रबळ गटांत रस्सीखेच सुरू होती.
 
धानोरकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसची उमेदवारी जवळपास निश्चित केली. मात्र माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती.
 
माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. ती नंतर या क्लिप प्रकरणानंतर बदलून धानोरकरांना देण्यात आली होती.