गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (12:08 IST)

महाराष्ट्र लोकसभा निकाल: युती जिंकली, पण राज्यात भाजपच मोठा भाऊ

- रोहन नामजोशी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला.
 
दुसरीकडे विजयी युतीपैकी भाजपने 25 जागा लढवून 23 जिंकल्या तर सेनेने 23 लढवून 18 जिंकल्या. अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा (युवा स्वाभिमान पक्ष) तर औरंगाबादमध्ये MIMचे इम्तियाज जलील विजयी झाले.
 
आतापासून साधारण सहा महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर या निकालांचा काय परिणाम होणार?
 
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणतात, "मोठाच परिणाम होईल. याची दोन महत्त्वाची कारणं आहेत - पहिलं म्हणजे, शिवसेना आणि भाजपची ऐन निवडणुकांच्या वेळी झालेली युती. पाच वर्षं शिवसेना भाजपवर टीका करत राहिली आणि निवडणुकीच्या वेळी मात्र युती केली.
 
"त्यातच शिवसेनेचा असा विचार असा होता की निवडणुकीनंतर भाजपला केंद्रात मदत लागली, संख्या कमी पडली तर मदत होईल आणि त्याबदल्यात काहीतरी पदरात पाडून घेता येईल. आता मात्र तसं व्हायची सुतराम शक्यता नाही. भाजपची भावना आता उपकारकर्त्याची असेल. त्यामुळे भाजपचं आता शिवसेनेला ऐकावं लागेल अशी स्थिती आहे."
 
"दुसऱ्या बाजूला काँग्रेसची जी वाताहत झाली आहे, ते पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय काहीही पर्याय नाही. ते एकत्र येतानाही काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागेल कारण राष्ट्रवादीचे खासदार जास्त आहेत.
 
"महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यासारखी आहे. अगदी आणीबाणीनंतरही जेव्हा काँग्रेसची जी बिकट अवस्था झाली, तेव्हाही महाराष्ट्राने काँग्रेसला आधार दिला होता. त्यामुळे आता जे घडलं आहे, ते काँग्रेससाठी अभूतपूर्व आहे. त्यामुळे त्यांनाही राष्ट्रवादीशी दुय्यम भूमिका घेऊन बोलावं लागेल," कुबेर पुढे सांगत होते.
 
"एकीकडे राष्ट्रीय पक्ष मोठा आणि प्रादेशिक पक्ष लहान, अशी अवस्था भाजपा शिवसेनेची तर प्रादेशिक पक्ष लहान तर राष्ट्रीय पक्ष मोठा, अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. त्यांना मनसेलाही सामावून घ्यावं लागेल.
 
"भाजपने जर शिवसेनेला बरोबरीची भूमिका दिली नाही तर शिवसेनेत मोठी नाराजी निर्माण होईल," असं कुबेर म्हणाले.
 
'भाजप शिवसेनेच्या जागा वाढतील'
सध्याच्या वातावरणात महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर भाजप आणि शिवसेनेची युती सशक्त होईल. दोन्ही पक्षांच्या एकत्रित जागांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी व्यक्त केली.
 
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे, कारण त्यांचा एकमेव विजयी उमेदवारही शिवसेनेतून आयात केलेला होता. त्यापेक्षा राष्ट्रवादीची कामगिरी सुधारली आहे, असं ते म्हणाले.
 
"मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत होऊनसुद्धा भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसने कामगिरी सुधारू शकते. त्याचबरोबर भाजप शिवसेनेसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दुष्काळ राहणार नाही. यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी भाजप शिवसेना सरकारच्या बाजूने राहतील," असंही परांजपे यांनी नमूद केलं.
 
'काँग्रेसने कामाला लागायला हवं'
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार, असं मत ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर यांनीही व्यक्त केलं. लोकसभेच्या निकालांमुळे भाजपलासुद्धा चालना मिळाली आहे आणि त्यामुळे त्यांना पुढे विधानसभेतला विजय सोपा असेल, असं त्यांचं मत आहे.
 
"आजपासून सहा महिन्यांवर निवडणुका आहेत. त्यांच्याकडे वेळ कमी आहे. खरंतर काँग्रेसने आजच काम करायला सुरुवात करायला हवी," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
 
निराशाजनक चित्र
काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीचं चित्र निराशाजनक आहे, सध्या तर काँग्रेसकडे नेतृत्वाची वानवा आहे, असं ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा सांगतात. "कोणत्याही निवडणुकीचा परिणाम हा पाच ते सहा महिने असतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यात तो परिणाम काँग्रेसला का टिकवता आला नाही, हाही एक प्रश्नच आहे."
 
काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोग्ये यांनी लोकसभेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "राजकारणात स्थित्यंतर होतच असतात. पराभवाने काँग्रेस पक्ष खचून जाणार नाही. विधानसभेसाठी आम्ही आम्ही योग्य तयारी करू."
 
"एकूणच कालचे नरेंद्र मोदी आणि आजचे मोदी यांच्यात फरक आहे. त्यामुळे त्यांनी जर महाराष्ट्रात प्रचार केला तर स्थिती काय असेल याची उत्सुकता असल्याची भावना राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली."