मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

राहुल गांधी: काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव हा गांधी कुटुंबाच्या राजकारणाचा अस्त?

लोकसभा निकालांमध्ये दारुण पराभव हाती आल्यानंतर शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक सुरू आहे. या चिंतन बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
 
ANI वृत्तसंस्थेनुसार, शनिवारी दुपारी साधारण एक वाजता राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला, मात्र कार्यकारिणी समितीने तो नाकारला. पण ही बैठक अजूनही सुरू असून हे राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले.
 
पण या निवडणुकीच्या निकालांनंतर गांधी कुटुंबाचं काँग्रेसमधलं वर्चस्व कायम राखता येईल का, याचं विश्लेषण करत आहेत बीबीसी प्रतिनिधी गीता पांडे.
 
या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी एकतर्फी विजय मिळविला तर दुसऱ्या बाजूला नेहरू-गांधी परिवाराचे उत्तराधिकारी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी एका पराभूत, हताश नेत्याच्या रूपात दिसले.
 
राहुल गांधी यांच्या खांद्यावर नेहरू-गांधी घराण्याचा वारशाचा भार आहे. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले नेते होते. त्यांची आजी इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तर त्यांचे वडील राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते.
 
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसचा अत्यंत वाईट पराभव झाला होता. मात्र गुरुवारी आलेल्या निकालांमुळे राहुल गांधी यांना दुहेरी धक्का बसला आहे.
 
काँग्रेसला केवळ 52 जागांवरच विजय मिळवता आला, शिवाय राहुल गांधी आपल्या घराण्याची परंपरागत अमेठीची जागाही गमावून बसले. अर्थात ते केरळच्या वायनाडचे खासदार म्हणून लोकसभेत जाणार आहेतच.
 
पण अमेठीतील लढाई ही सन्मानाचीही लढाई होती. या मतदारसंघातून त्यांची आई सोनिया गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी निवडणूक जिंकली होती. तसेच ते स्वतः तिथं पंधरा वर्षं खासदार होते.
 
राहुल गांधी यांनी अमेठीतल्या प्रत्येक घरात एक विशेष पत्र पाठवलं होतं. त्यात 'मेरा अमेठी परिवार' असं लिहिलं होतं. तरीही त्यांना केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्याकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
उत्तर प्रदेशचं महत्त्व
दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो, असं म्हणतात आणि अमेठी याच उत्तर प्रदेशाच्या हृदयासारखंच आहे.
 
उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या प्रयोगांचा प्रभाव संपूर्ण देशावर दिसून येतो. जो पक्ष उत्तर प्रदेश जिंकतो तोच देशावर राज्य करतो, असं सामान्यतः म्हटलं जातं.
 
आतापर्यंत झालेल्या 14 पंतप्रधानांपैकी 8 पंतप्रधान याच राज्यातून निवडून गेले आहेत. राहुल यांचे पणजोबा, आजी, वडील इथूनच जिंकले आणि पंतप्रधान झाले. 543 सदस्यांच्या लोकसभेत 80 खासदार या राज्यातून निवडून जातात.
 
नरेंद्र मोदीसुद्धा गुजरातच्या बडोद्याशिवाय वाराणसी मतदारसंघातून लढले होते आणि यावेळेसही ते इथूनच निवडून गेले आहेत.
 
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला यंदा एकच जागा आली - सोनिया गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ.
 
राहुल आता वायनाडमुळे खासदार राहातील पण हा काँग्रेसमधील गांधीयुगाचा अंत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. किंवा पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी गांधी परिवाराच्या राजकारणालाच संपवण्यात आले आहे?असा प्रश्न समोर येत आहे.
 
काँग्रेसला काय हवंय?
पराभव झाल्यावर राहुल गांधींनी पत्रकारांशी बोलताना पराभवाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. "मी हा पराभव स्वीकारून भाजपला मिळालेल्या जनादेशाचा आदर करतो," असं ते म्हणाले.
 
अमेठीतली मतमोजणी पूर्ण झालेली नव्हती. तीन लाख मतांची मोजणी बाकी होती परंतु पराभव स्वीकारून "त्यांनी अमेठीची काळजी घ्यावी," असं स्मृती इराणींना उद्देशून म्हटलं.
 
ते म्हणाले होते, "मैं उन्हें मुबारकबाद देता हूं. वो जीत गई हैं. ये प्रजातंत्र हैं और मैं लोगों के फ़ैसले का सम्मान करता हूं."
 
काँग्रेसच्या पराभवावर त्यांनी जास्त बोलणं टाळलं. काय चुका झाल्या, यावर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत होईल असं ते म्हणाले.
 
कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, "घाबरण्याची गरज नाही. आम्ही मेहनत करत राहू. शेवटी विजय आपलाच होईल."
 
मात्र एकापाठोपाठ पराभूत होत चाललेल्या नेत्यांना पाहून लखनौमधील एक काँग्रेस नेते आम्हाला म्हणाले, "आमच्या विश्वासार्हतेत मोठी घट झाली आहे. लोकांना आमच्या आश्वासनांवर आता विश्वास नाही. आम्ही जे सांगत आहोत, त्यावर ते विश्वास ठेवत नाहीत."
 
"मोदींनी लोकांना जी आश्वासनं दिली, ती त्यांनी पूर्ण केली नाहीत तरीही लोक मोदींवर भरवसा ठेवतात."
 
"पण असं का होत आहे" असं मी त्यांना विचारलं.
 
तेव्हा ते म्हणाले, "असं का आहे, ते आम्हालाही माहिती नाही."
 
निवडणुकांमध्ये काँग्रेसचा असा वाईट पराभव झाल्यावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होणं निश्चित होतं. अनेक विश्लेषक नेतृत्व बदलाची चर्चाही करत आहेत. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. पण या सर्व मागण्या पक्षाबाहेरून होत आहेत. पार्टीचे नेतृत्व त्या मागण्या नाकारेलच."
 
दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही राहुल गांधींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा होतीच.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी बीबीसीला सांगितलं, "काँग्रेस आपल्याच नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणार नाही. आणि राहुल गांधी यांनी राजीनामा दिला तरी तो स्वीकारला जाणार नाही."
 
अय्यर म्हणाले, "पराभवाला नेते जबाबदार नाहीत, पराभवाची कारणं वेगळी आहेत आणि त्यावर आम्हाला काम करावं लागेल."
 
लखनौमधील पक्षप्रवक्ते ब्रिजेंद्र कुमार सिंह म्हणाले, "पार्टीचं नेतृत्व ही समस्या नाही तर निवडणुकीतील चुकीचे मुद्दे ही समस्या आहे. पक्षाच्या रचनेत काही कमजोरी आहे. नेत्यांमध्ये अंतर्गत लढाईही आहे. आमची निवडणूक मोहीम उशिरा सुरू झाली. आमचे प्रयत्न भलेही अपयशी ठरले तरीही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करणं एक अयोग्य विचार होता," असंही ते म्हणाले.
 
व्यक्तिमत्त्वांची स्पर्धा?
ही निवडणूक बऱ्यापैकी राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी व्यक्तिमत्त्वांची स्पर्धा म्हणून पाहिली गेली आणि राहुल गांधी त्यात पराभूत झाले.
 
ब्रॅंड मोदी त्यांच्या रस्त्यातील एक मोठा अडथळा होता, असं काँग्रेसचे काही विश्लेषक खासगी चर्चांमध्ये मान्य करत आहेत.
 
मोदींकडून राहुल गांधींचा असा पराभव पहिल्यांदाच झालेला नाही. 2014 साली त्यांच्या पक्षाला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र तेव्हा राहुल यांना पराभवासाठी पूर्णपणे जबाबदार ठरवलं नव्हतं, कारण तेव्हा ते पक्षाध्यक्षही नव्हते.
 
परंतु त्यानंतर अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पराभव सहन करावा लागला. राहुल वास्तवापासून खूप दूर आहेत, त्यांना काहीही माहिती नाही," अशी टीका त्यांच्यावर सतत झाली.
 
सोशल मीडियावर त्यांना 'पप्पू' म्हटलं जाऊ लागलं आणि त्यांचे मीम्स बनवले गेले. ते एक विनोदी पात्र झाले होते.
एका सामान्य कुटुंबातील नरेंद्र मोदी राहुल गांधीच्या घराण्यावरून त्यांना सतत लक्ष्य करत राहिले. आपल्या सभांमध्ये त्यांना 'नामदार' म्हणून संबोधित करू लागले. राहुल आपल्या कामगिरीवर नाही तर घराण्यामुळे या उच्च स्थानी पोहोचले आहेत, असं मोदी लोकांना सतत पटवून देत राहिले.
 
काँग्रेसचे कार्यकर्ते खासगी चर्चांमध्ये सांगताना म्हणतात, "राहुल हे एक साधे व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्ध्याचा मुकाबला करण्याची इच्छा नाही आणि चलाखी नाही."
 
त्यामुळे याला राहुल यांना निरुपयोगी म्हणावं की गांधी ब्रँडला निरुपयोगी म्हणावं?
 
भारतीय राजकारणात सतत प्रकाशझोतात राहिलेल्या नेहरू-गांधी या नावांची चमक आता फिकट झाली आहे. विशेषतः शहरी मतदार आणि तरुणांनी या नावाला नाकारलं आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील कामाला आता काहीही अर्थ उरलेला नाही.
 
ते काँग्रेसला 2004-2014च्या शासनकाळावरून जोखतात. या काळात काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले.
 
गुरुवारच्या निकालांवरून हे आरोप अजूनसुद्धा ताजे असल्याचं दिसलं आणि त्याच दृष्टीने ते अजून पाहात आहेत, हे सिद्ध झालं आहे. राहुल सामान्य मतदारांशी जोडून घेऊ शकले नाहीत.
 
गांधींचा पुनर्जन्म
पण काँग्रेसचे लोक राहुल गांधी किंवा त्याचंया नावाला पराभवासाठी जबाबदार धरत नाहीत. राहुल यांना अमित शाह यांच्यासारख्या सहकाऱ्याची गरज आहे, असा सल्ला त्यांच्या पक्षाचे एक कार्यकर्ते देतात.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना गुजरात आणि देशात भाजपाच्या विजयाची रणनीती बनवण्याचं श्रेय दिलं जातं.
 
काँग्रेस कार्यकर्ते उघडपणे राहुल यांना जबाबदार धरणार नाहीत आणि इतिहास पाहिला तर ते राहुल यांच्या मागेच उभे राहातील.
 
गेल्या दोन वर्षांमध्ये राहुल यांच्या करिअरच्या आलेखात काही सुधारणा झाली. त्यांच्या राजकीय वर्तनात मोकळेपणा आला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिमेत सुधारणा झाली.
 
नोटाबंदीसारखे वादग्रस्त सल्ले, वाढती बेरोजगारी, देशात वाढती असहिष्णुता, कमकुवत होत चाललेली अर्थव्यवस्था, अशा विषयांवर त्यांनी आपले मुद्दे ताकदीने मांडले.
 
आपल्या आक्रमक वागण्यातून त्यांना आखलेल्या अजेंड्यामुळे गेल्या वर्षी ते राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पक्षाला विजय मिळवून देऊ शकले.
 
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांची बहीण प्रियंका गांधी औपचारिकरीत्या राजकारणात आली तेव्हा गांधी ता काहीतरी करतील असं वाटू लागलं होतं.
 
प्रियंका गांधी त्यांच्या राजकीय परिवाराला वाचवतील असं काही काँग्रेस समर्थकांना वाटत होतं. राजकीय मशाल हाती घेण्यापासून प्रियांका गांधी इतकी वर्षे कचरत होत्या, त्याच कारण काहीही असलं तरी त्या परिवाराच्या राजकारणाला वाचवू शकतील असं कार्यकर्त्यांना वाटतं, पण राहुल यांना बाहेर काढण्याच्या कोणत्याही योजनेत प्रियंका सामील होतील, असं वाटत नाही.
 
पक्षाचे पदाधिकारी वीरेंद्र मदान सांगतात, "जर तुम्ही आमचं घोषणापत्र पाहिलंत तर हे सर्वात चांगलं घोषणापत्र असल्याचं दिसून येईल. ज्या योजनांची, आश्वासनांची घोषणा आम्ही केली होती, त्या अत्यंत चांगल्या होत्या. मात्र मतदारांचं सहकार्य आणि समर्थन आमच्या अपेक्षेनुसार लाभलं नाही."
 
कुठे चूक झाली याचं अवलोकन आणि परीक्षण आम्ही लवकरच करू, असंही मदान सांगतात.
 
"निकाल अनपेक्षित असले तरी नेतृत्वामागे न उभारण्याचा प्रश्नच येत वाही. फक्त राहुल गांधीच हरलेले नाहीत तर अनेक मोठे नेते पराभूत झालेले आहेत. निवडणुका येता आणि जातात.
 
"काही निवडणुका तुम्ही जिंकता आणि काही तुम्ही पराभूत होता. 1984 ची निवडणूक आठवून पाहा. तेव्हा बाजपच्या केवळ 2 जागा आल्या होत्या. ते राजकारणात पुन्हा आले तसेच आम्हीही येऊ," अशा शब्दांमध्ये मदान यांनी भावना मांडल्या.