शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (17:56 IST)

स्मृती इराणी : नरेंद्र मोदींविरुद्ध केलेलं उपोषण ते राहुल गांधींना हरवण्यापर्यंतचा प्रवास

मोदी सरकारच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अमेठीचा अभेद्य समजला जाणारा किल्ला भेदला आहे.
 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना त्यांनी 55,120 मतांनी हरवलं आहे. राहुल गांधी अमेठीतून तीन वेळा निवडून आले होते आणि त्याआधी सोनिया गांधी इथून निवडून आल्या होत्या.
 
त्याही आधी संजय गांधी आणि मग राजीव गांधींनी अमेठीला काँग्रेसचा, विशेषतः गांधी परिवाराचा बालेकिल्ला बनवला होता. राजीव गांधीही या जागेवरून तीनदा निवडून आले होते.
 
मागच्या निवडणुकीतही स्मृती इराणी राहुल गांधींच्या विरोधात अमेठीत मैदानात उतरल्या होत्या. त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात त्या राहुल गांधींचा पराभव करण्याच यशस्वी ठरल्या आहेत.
 
अमेठीमध्ये एका ठिकाणी लागलेली आग विझवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देणाऱ्या, स्वतः नळ सोडून पाणी मारणाऱ्या आणि एका वृद्ध महिलेचं सांत्वन करणाऱ्या स्मृती जेव्हा राष्ट्रीय चॅनलवर दिसल्या तेव्हा जाणकारांच्या लक्षात आलं की त्यांची अमेठीमधली ताकद वाढलीये. 2014 च्या तुलनेत त्यांना मिळणारा पाठिंबा वाढलाय, पण तरी त्या राहुल गांधींना धोबीपछाड देतील असा अंदाज कोणालाच नव्हता.
स्मृती इराणी 2014 मध्ये स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये आधी मनुष्यबळ मंत्री, मग माहिती आणि प्रसारण मंत्री तर सरतेशेवटी वस्त्रोद्योग मंत्री होत्या.
 
या दरम्यान त्यांच्या पदवीपासून, मनुष्यबळ मंत्री असताना त्यांनी केलेल्या वक्तव्यापर्यंत तसंच रोहित वेमुला प्रकरण त्यांनी ज्याप्रकारे हाताळलं, त्यावरून अनेक वाद झाले.
 
असं असतानाही त्या सुषमा स्वराज आणि निर्मला सीतारामन यांच्याबरोबरीने कॅबिनटमधल्या प्रभावशाली महिला मंत्र्यांपैकी एक चेहरा बनल्या.
 
"क्योंकि सांस भी कभी बहू थी' या सीरियलव्दारे घराघरात पोहचलेल्या स्मृती 2003 मध्ये भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन सक्रिय राजकारणात उतरल्या.
 
पण खूप कमी जणांना माहित असेल की स्मृतींनी एकदा नरेंद्र मोदींच्या विरोधात उपोषण करण्याचा प्रयत्न केला होता.
 
2004 मध्ये स्मृती इराणी भाजपमध्ये नव्या नव्या आल्या होत्या आणि पक्षाच्या तिकिटावर दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरल्या होत्या.
 
तेव्हा त्यांनी गुजरात दंगलींच्या कारणावरून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यांच्या विरोधात उपोषण करण्याची धमकीही दिली होती.
 
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं अनेकदा नाव घेऊन त्यांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदी अजूनही आपलं पद सोडत नाहीत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतंय.
 
पण हायकमांड करून त्वरित आदेश आला की त्यांनी आपलं विधान मागे घ्यावं किंवा कारवाईसाठी तयार असावं.
 
यानंतर त्यांनी आपलं वक्तव्य बिनशर्त मागे घेतलं.
तरबेज वक्ता
भाजपचा अभ्यास असणारे जुने जाणकार सांगतात की, स्मृती इराणींना राजकारणात आणण्यामागे प्रमोद महाजन यांचा हात होता. पण 2006 मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर त्याच्या राजकीय प्रवासाच्या वेगाला वेसण बसली. काही काळ त्यांनी भाजपमध्ये निमुटपणे काम केलं. आपल्या वक्तृत्वाच्या कौशल्यासाठी त्या ओळखल्या जातात. याच कौशल्याचा वापर करून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
 
यानंतर स्मृतींना महाराष्ट्रच्या भाजप महिला मोर्चाचं अध्यक्ष नियुक्त केलं गेलं. 2009 मध्ये त्यांना तिकिट मिळालं नाही, पण तीन-चार भाषांवर असणाऱ्या प्रभुत्वामुळे त्यांनी देशभर भाजपचा प्रचार केला.
 
2010 मध्ये जेव्हा नितिन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले तेव्हा स्मृती इराणींना राष्ट्रीय महिला मोर्चाचं अध्यक्षपद दिलं गेलं.
 
त्याच्या पुढच्याच वर्षी त्या गुजरातमधून राज्यसभेवर गेल्या आणि तिथल्या राजकारणात सक्रिय झाल्या. याच काळात त्या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची खुलेआम प्रशंसा करायला लागल्या.
 
अनेक जाणकारांचं म्हणणं आहे की पक्षात महत्त्व वाढताना त्यांना लैंगिक भेदभावाचाही सामना करायला लागला.
 
पण त्याच्या वक्तृत्व कौशल्यामुळे त्या पक्षाच्या राष्ट्री प्रवक्ता बनल्या. टीव्ही चॅनल्सवर सतत दिसत राहिल्याने त्या सतत प्रकाशझोतात राहिल्या.
 
अमेठीची लढाई
2014 मध्ये जेव्हा भाजप नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर विसंबून निवडणूक लढवत होता तेव्हा पक्षाने त्यांना राहुल गांधींच्या विरोधात लढायला अमेठीमध्ये पाठवलं होतं.
 
2009 साली भाजप उमेदवाराला फक्त 37,500 मतं मिळाली होती, त्यामुळे 2014 साली स्मृती इराणींकडे करण्यासारखं खूप होतं. पण अमेठी मतदारसंघ त्यांना नवा होता आणि इथली भाषाही त्यांना अनोळखी होती.
 
त्यांनी यावेळी प्रचार करताना म्हटलं की, गांधी परिवाराची जागा असूनही गेल्या 10 वर्षांत इथे काहीच झालं नाही.
 
त्या घराघरात गेल्या, महिलांशी संवाद साधला आणि गावखेड्यातल्या लोकांशी चर्चा करायला जमिनीवर बसल्या.
 
त्यांना या निवडणुकीत 3 लाखाहून जास्त मतं मिळाली. राहुल गांधी एक लाखाहून अधिक मताधिक्यांने जिंकून आले.
 
पदवीवरून वाद
निवडणूक हरल्यानंतरही राहुल गांधींशी टक्कर घेतल्याचा त्यांना फायदा मिळाला आणि स्मृती इराणींना केंद्रात मंत्रिपद मिळालं.
 
पण त्यांच्या पदवीवरून वाद झाला. स्मृतींनी निवडणुकीच्या वेळेस दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या पदवीविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप झाला.
 
त्यांनी एका प्रतिज्ञापत्रात दिल्ली विद्यापीठातून 1996 साली कलाशाखेत पदवी घेतल्याचं म्हटलं होतं. पण दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात 1994 साली दिल्लीच्या स्कूल ऑफ लर्निंगमधून बीकॉम पार्ट वनची पदवी घेतल्याचं म्हटलं होतं.
 
मग 2019 साली उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी म्हटलं की त्या ग्रॅज्युएट नाहीयेत. त्यांनी बीकॉम पार्ट वनच्या पुढे कंसात लिहिलं की, 'तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही.'
 
रोहित वेमुलाची आत्महत्या
हैदराबाद विद्यापीठातले दलित विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येनंतर स्मृती इराणींना विरोधी पक्षांनी लक्ष्य बनवलं.
 
स्मृती इराणींच्या मंत्रालयाने केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या तक्रारीच्या हवाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका नेत्याला मारहाण केल्याच्या आरोपाची दखल घेऊन कारवाई करायला सांगितली होती.
 
यानंतर विद्यापीठाने पाच दलित विद्यार्थ्यांना निलंबित केलं होतं. या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधूनही काढून टाकलं होतं. यानंतर या विद्यार्थ्यांपैकी एक असणाऱ्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली होती.
 
रोहितच्या मृत्यूनंतर स्मृतींना संसदेत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. त्यांच्यांवर विरोधी पक्षानी सडकून टीका केली आणि संसदेची दिशाभूल करण्याचा आरोप केला.
 
माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून कार्यकाल
स्मृती इराणींना जेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सोपवला गेला तेव्हाही वादांनी त्यांची पाठ सोडली नाही.
 
त्यांनी पदभार स्वीकारताच भारतीय माहिती सेवेत कार्यरत असलेल्या तीन डझनहून जास्त अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. यात काही अधिकारी असे होते जे काही महिन्यातच रिटायर होणार होते.
 
हा वाद कमी होता की काय म्हणून स्मृतींनी चुकीच्या बातम्या दिल्या तर पत्रकारांना शिक्षा करण्याचं पत्रक जारी केलं.
 
यात पत्रकारांची मान्यता रद्द करण्यासारखे मुद्दे होते. मीडिया संस्थांनी याचा विरोध केला आणि ज्या दिवशी पत्रक जारी केलं, त्याच रात्री रद्द करण्यात आलं.
 
एवढं सगळं होऊनही स्मृती मैदानात टिकून राहिल्या. आता अमेठीतून जिंकून आल्यानंतर त्यांची किंमत वाढणार हे नक्की.