1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरुपौर्णिमा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जुलै 2025 (20:32 IST)

गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करण्याची संपूर्ण पूजा विधी, लागणारे साहित्य जाणून घ्या

गुरु पौर्णिमा हा दिवस वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारत लिहिले. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करणे हे दत्त संप्रदायातील भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, ज्ञान प्राप्त होते आणि गुरुंचा आशीर्वाद मिळतो.
हा दिवस महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो, त्यामुळे याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.
गुरु पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करण्याची विधी -
सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजेच्या ठिकाणाची स्वच्छता करावी.
पूजेच्या ठिकानी दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवावा. चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरावे आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे.
पूजा आणि पारायणादरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखावी. 
मांसाहार, मद्यपान टाळावे.
नियमितता: पारायण सप्ताहात दररोज ठराविक वेळी वाचन करावे.
 
पूजेसाठी लागणारे साहित्य-
दत्तगुरूंची मूर्ती/फोटो, फुले, तुळशीपत्र, उदबत्ती, समई, अगरबत्ती, गंध, हळद-कुंकू, नारळ, विड्याची पाने, सुपारी, नैवेद्य (गव्हाची पोळी, गोड पदार्थ), पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), गंगाजल.
पूजा सुरु करण्यापूर्वी आचमन करून संकल्प घ्या, मी दत्तगुरूंच्या कृपेसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी ही पूजा करीत आहे. विड्याची पाने, सुपारी आणि नारळ अर्पण करून दत्तगुरूंना पारायणासाठी उपस्थित राहण्याची प्रार्थना करावी.
गणपती, विष्णू आणि गुरु दत्तात्रेय यांचे स्मरण करावे. गणपती अथर्वशीर्ष आणि दत्त मंत्रांचे पठन करावे.
पूजा करताना गायत्री मंत्र, ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः” किंवा “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”.
याशिवाय, “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥” हा मंत्र गुरुस्तवनासाठी म्हणावा.आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यावा.
पूजेदरम्यान दत्तगुरूंना गोड पदार्थ, फळे, आणि पंचामृत अर्पण करावे. तुळशीपत्रे आणि फुले अर्पण करावीत.समई आणि अगरबत्ती सतत पेटती ठेवावी.
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण करणे शुभ मानले जाते.पारायण करताना मुख पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावे. पारायण पहाटे 3 ते सायंकाळ 4 या वेळेत करावे. पारायणापूर्वी दत्तगुरूंच्या फोटोची आणि पोथीची पूजा करावी.
पूजा पूर्ण झाल्यावर गुरुंना (किंवा त्यांच्या प्रतिमेला) वस्त्र, फळे, फुले आणि गुरुदक्षिणा अर्पण करावी.
घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
पूजा संपल्यानंतर आरती करावी. दत्तगुरूंची आरती किंवा “जय देव जय देव दत्त अवधूता” ही आरती म्हणावी.
प्रसाद वाटून घ्यावा आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा द्याव्यात.
Edited By - Priya Dixit