बुलढाण्यात बायकोच्या विरोधात नवऱ्याचं उपोषण
नवरा बायकोत भांडण होणं काही नवीन नाही. जिथे भांडण असते तिथे प्रेम देखील असते. पण कधी कधी हे भांडण विकोपाला जातात. आणि काही जण आपले आयुष्य संपवतात. तर काही विभक्त होतात. पण पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यावर पतीने उपोषण केले हे प्रथमच ऐकायला मिळत आहे. पत्नीकडून न्याय मिळवण्यासाठी बुलढाण्यात नांदूरातील एका पतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण केले आहे. गणेश मुरलीधर वदोडे असे या पतीचे नाव आहे. गणेश यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर त्यांचे त्यांच्या पत्नीशी काही जुळले नाही. म्हणून ते दोघे घटस्फोट न घेता वेगळे राहू लागले. अनेक दिवस त्यांनी पत्नीची वाट पहिली ती आली नाही. त्यांच्या पत्नीने घटस्फोट न घेताच दुसरं लग्न केले. पत्नीने दुसरं लग्न केल्याची बातमी मिळतातच पतीने थेट नांदूर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात पत्नीची तक्रार केली. तक्रार देऊन देखील कोणतीही कारवाई करत नसल्याने गणेश आता चक्क तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहे.