'मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं'
मुंबई : सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ड्रग्जमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तो श्रीलंकेला जाण्याआधीच त्याला साकीनाका पोलिसांनी पकडले आहे. ललित पाटीलला न्यायलयात घेऊन मुंबई पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना अटकेत असलेल्या ललित पाटीलने गौप्यस्फोट केला आहे.
दरम्यान "मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं" गेल्याचा गौप्यस्फोट ललित पाटीलने केला आहे. रूग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं असता ललित पाटीलने हा गौप्यस्फोट केला आहे तसेच यात कोणाकोणाचा हात आहेे ते सर्व सांगेन असं ललित पाटील यावेळी म्हणाला.
मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात लवकरच सांगणार
ललित पाटीलने पोलीसांच्या गाडीत बसण्याअगोदर सांगितले आहे की, मी लवकरच मीडियाशी बोलेल. मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं आहे. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे, हे लवकरच सांगणार आहे, असे ललित पाटील म्हणाला.
ललित पाटीलला बंगळुरूमधून पळून जाताना अटक झाली. ललित पाटीलसह त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलीस दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
पळ काढल्यानंतर ललित पाटील नाशिकमध्येच
ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला राजकीय पाठींबा होता का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तपास यंत्रणांनी शोध कार्याला गती येताच नाशिकमधून त्याने पळ काढला. त्यानंतर इंदोरवरून तो सुरतमध्ये गेला. सुरतमध्ये आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात त्याने प्रवेश केला. दरम्यान या प्रकरणात पुढे काय होत हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.