रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (08:33 IST)

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास इथं पैसाच राहणार नाही - राज्यपाल

"मुंबई-ठाण्यातून जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही," असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलंय.
 
मुंबईतील अंधेरी भागातील एका चौकाला शांतीदीदी चंपालालजी कोठारी असं नाव देण्यात आलं. या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारींनी हे वक्तव्य केलं.
 
कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले की, "राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती-राजस्थानी हा विषय राहू द्या, यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकीर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे."