शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (07:46 IST)

कुणी अंगावर आले तर शिंगावर घ्या. मी वकिलांची फौज उभी करेन

raj thackeray
राज ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. विविध तालुक्यांमध्ये जाऊन ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सोमवारी त्यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात मोठं विधान केलं आहे. कुणी तुमच्या अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या. त्यांनी हात उचलला तर तुमच्याकडे हात उचलला पाहिजे. मी वकिलांची फौज उभी करतो, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.
 
कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, “जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी तीन सभा घेणार आहे. मुंबई, कुडाळ आणि चिपळून येथे या तीन सभा होणार आहेत. हा संपूर्ण दौरा पक्षाची घट्ट बांधणी करण्यासाठी होता. कोकणातले आपले कोकणवासीय आणि मुंबईस्थित कोकणवासीय यांच्यात मिलाप व्हावा, हा कोकण दौऱ्याचा हेतू होता.”
 
“मुंबईत गेल्यावर माझ्या काही बैठका होतील. पक्ष जितका घट्ट बांधता येईल, तितका घट्ट बांधण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. आता मी प्रत्येक तालुक्यात जाऊन आलो. लवकरच तुमच्यापर्यंत काही कार्यक्रम येतील, हे कार्यक्रम राबवत असताना कुणाचीही पर्वा करू नका. कोणत्याही दुसऱ्या पक्षाची पर्वा करू नका. कुणी अंगावर आले तर शिंगावर घ्या. मी वकिलांची फौज उभी करेन. हे मी तुम्हाला मुद्दामहून आताच सांगतोय,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor