बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (08:57 IST)

उद्धवजींना आमदार सोडून गेले तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत? – चंद्रशेखर बावनकुळे

chandrashekhar bavankule
सांगली – उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणेघेणे नव्हते. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत ? आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सांगली येथे केली.
 
ते सांगली जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कामगारमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. गोपीचंद पडळकर आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते.
 
बावनकुळे म्हणाले की, राज्यात गुंतवणूक व्हायची असेल तर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री अठरा महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. वरिष्ठ सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पहावी लागे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार यांना आणि काँग्रेस पक्षाला सांभाळण्यात जात होता. त्यांनी स्वतःला बंदिस्त केले होते. ते कोणाला बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या, उद्योगांना जागा दिली जात नव्हती, करार होत नव्हते, पर्यावरण परवानग्या दिल्या जात नव्हत्या, उद्योजकांचे शंकानिरसन केले जात नव्हते. यामुळे महाविकास आघाडी सरकारमुळे एकेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे.
 
त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात आली असताना त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होण्याच्या ऐवजी काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. कोल्हापूरमध्ये काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी सातारा, ठाणे, मीरा भाईंदर अशा ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांची यात्रा राज्यात असताना काँग्रेस कार्यकर्ते भाजपात का प्रवेश करत आहेत, हा त्या पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor