गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश: IMA माजी प्रदेशाध्यक्षांना अटक; रॅकेटचे धागेदोरे राज्याबाहेर
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी एका डॉक्टरसह एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कारवाईची पार्श्वभूमी: पिंपरी निर्मळ येथील एका बेकायदा केंद्रावर कारवाई केल्यानंतर, या प्रकरणाचे धागेदोरे श्रीरामपूरपर्यंत पोहोचले. पोलिसांनी सापळा रचून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांचा सहभाग समोर आला असून पोलिसांना त्यांना अटक केली आहे.
कसे चालायचे रॅकेट: तपासात असे समोर आले आहे की, एजंटमार्फत गर्भवती महिलांना या केंद्रावर आणले जात असे. साधारण १० हजार रुपयांमध्ये गर्भलिंग निदानाची चाचणी केली जात होती. गोपनीयता पाळण्यासाठी एजंट स्वतः महिलांना गाडीतून ठराविक ठिकाणी घेऊन येत असत आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेरच थांबवून ठेवले जाई. केवळ स्थानिकच नव्हे, तर बीड, नाशिक, पुणे, संगमनेर आणि नांदगाव यांसारख्या विविध शहरांतून महिला या ठिकाणी तपासणीसाठी येत होत्या.
जप्त मुद्देमाल व अटक: पोलिसांनी या कारवाईत गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे यूएसजी (सोनोग्राफी) मशीन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या मुख्य डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
