मणिपूरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा-आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला मणिपूर घटनेवर राजधर्माची आठवण करून दिली आहे. मणिपूरमध्ये कुकी महिलांची नग्न परेड केल्याच्या मुद्द्यावरून मणिपूर सरकार बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, मणिपूरचा व्हायरल झालेला व्हिडिओ अतिशय दुःखद आहे. स्त्री असो वा पुरुष, कोणाशीही असे वागणे भारतात अस्वीकार्य आहे. मणिपूरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ते म्हणाले की, ज्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या समोरच तिच्या वडील आणि भावाची हत्या झाल्याचे मी ऐकले. या सर्व गोष्टी देशाला शोभत नाहीत आणि देशाच्या विरोधात आहेत. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला आणि ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा त्या ठिकाणचे मुख्यमंत्री बोलत आहेत. मणिपूरमध्ये इंटरनेटवर 70 दिवस बंदी घालण्यात आली होती व अश्या अनेक गोष्टी आतापर्यंत लपवून ठेवण्यात आल्या होत्या. ही घटना सर्वांसाठी लाजिरवाणी आहे. मणिपूरमध्ये राजधर्म पाळला गेला पाहिजे. तेथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी असे ते म्हणाले.
Edited By- Ratnadeep Ranshoor