सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (07:19 IST)

राज ठाकरे : ‘मणिपूर दोषींना फाशी द्या, ...अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’

raj thackeray
मागच्या अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये सुरु असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान मागच्या बुधवारी मणिपूरमधल्या दोन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
 
हा व्हीडिओ खरा असल्याची खात्री करून मणिपूर पोलिसांनी म्हटले आहे की, मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात 4 मे रोजी या दोन महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या होत्या.
 
मणिपूर पोलीस म्हणाले की, ''ही घटना 4 मेची आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.''
 
हा व्हीडिओ समोर आल्यापासून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल - राज ठाकरे
मणिपूरमधल्या या घटनेवर ट्वीट करत राज ठाकरे यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
 
तसंच या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकासुद्धा केली आहे. पंतप्रधानांनी केलेला घटनेचा निषेध पुरेसा नसून कृती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
“कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत. दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे.
 
आणि हेच दुर्दैव आहे. ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं.
 
मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल.”
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मणिपूर प्रकरणावर सार्वजनिक ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. शिवाय सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेतल्याचं दिसून येत आहे.
 
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी संसदेत पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मणिपूरमधील घटनेमुळे माझे हृदय दु:खाने भरले आहे. ही घटना लज्जास्पद आहे. हे पाप करणारे किती लोक आहेत, ते नेमके कोण आहेतते आपापल्या जागी, पण संपूर्ण देशाचा अपमान होत आहे.
 
140 कोटी देशवासियांना या प्रकारणाची लाज वाटत आहे. मी मुख्यमंत्र्यांना माता-भगिनींच्या रक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन करतो."
राजस्थान, छत्तीसगड, मणिपूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, घटना कोणत्याही राज्यातील असो, सरकार कोणतेही असो, महिलांच्या सन्मानासाठी राजकारणाला दूर ठेवून काम केले पाहिजे.
 
मी देशवासियांना हा विश्वास देऊ इच्छितो की कोणालाही सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे काही झाले त्याबद्दल कुणालाही माफ केले जाणार नाही."
 
सुप्रीम कोर्टाकडून दखल
या प्रकरणाची सू-मोटो दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सरन्यायाधीश याबद्दल म्हणाले, सरकारने आवश्यक ती पावलं उचलावीत. हा प्रकार आजिबात स्वीकारार्ह नाही. हे अत्यंत अस्वस्थ करणारं असून घटनात्मक आणि मानवी हक्काची ही पायमल्लीच आहे.
 
काँग्रेससह इतरही विरोधी पक्ष या प्रकरणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
तर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर लिहिले की त्यांनी या प्रकरणावर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी चर्चा केली आहे आणि दोषींना पकडण्यामध्ये कसलीच कसर सोडली जाणार नाही.
 
FIR मध्ये नेमकं काय लिहिलं आहे?
इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकामध्ये छापून आलेल्या बातमीनुसार कुकी-झोमी समुदायातील या महिलांवर मैतेई जमातीचे वर्चस्व असलेल्या थौबल जिल्ह्यात 4 मे रोजी लैंगिक अत्याचार झाले होते.
 
असे असले तरी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत दाखल करण्यात आलेली एफआयआर 18 मे रोजी म्हणजेच घटनेच्या तब्बल 14 दिवसानंतर कांगपोकपी जिल्ह्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण संबंधित पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.
 
मणिपूर पोलीस दलात उच्च पदावर असणारे पोलीस अधीक्षक मेघचंद्र सिंह यांनी या प्रकरणी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की याप्रकरणातील दोषींना पकडण्यासाठी मणिपूर पोलीस पुरेपूर प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनपर्यंत तरी या प्रकरणामध्ये कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
 
या व्हीडिओमध्ये दिसणारी एक महिला ही जवळपास २० वर्षांची आहे तर दुसऱ्या महिलेचे वय ४० वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.
 
या महिलांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की व्हिडिओमध्ये गर्दीमुळे केवळ दोनच महिला दिसत आहेत पण जमावाने आणखीन एका ५० वर्षीय महिलेला देखील कपडे काढायची सक्ती केली.
 
एफआयआरमध्ये म्हटले आहे की दिवसाढवळ्या एका युवतीवर सामूहिक बलात्कार देखील करण्यात आलेला आहे.
 
पीडित महिलांनी सांगितले की, 3 मे रोजी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या 800 ते 1000 लोकांनी थौबल जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या गावावर हल्ला केला. या लोकांनी आधी लूटमार केली आणि नंतर गावाला आग लावायला सुरुवात केली.
 
अशा परिस्थितीत या गावातील दोन महिला आणि एक तरुणी त्यांच्या वडील आणि भावासह जंगलाच्या दिशेने पळाले.
 
या तक्रारीत सांगण्यात आल्याप्रमाणे पोलीस या महिलांना वाचविण्यातही यशस्वी ठरले होते पण या पीडितांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जमावाने दोन किलोमीटर आधीच त्यांना अडवले.
 
यानंतर जमावाने या महिलांना पोलिसांकडून हिसकावून घेतले, या तरुणीच्या वडिलांना त्याचजागी ठार करण्यात आले.
 
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या तिन्ही महिलांना जमावासमोर नग्नावस्थेत चालण्यास भाग पाडण्यात आले आणि तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी सामूहिक बलात्कारा केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. एफआयआरनुसार, या तरुणीच्या 19 वर्षीय भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही जमावाकडून ठार करण्यात आले.
 
पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू
इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम या आदिवासी संघटनेने या प्रकरणावर एक निवेदन जारी केले असून, त्यांचे असे म्हणणे आहे की लैंगिक अत्याचार करणाऱ्यांनी या पीडितांची ओळख उघड करणारे व्हीडिओ सार्वजनिक केल्याने या महिलांवर अधिक अत्याचार झाले आहेत.
 
त्याचवेळी महिला संघटनेने या प्रश्नावर निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी जाहीर केली आहे.
 
मणिपूरमध्ये असणाऱ्या इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, कक्चिंग आणि थौबल या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
 
हिंदू या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार , मणिपूरमधील सद्यस्थिती लक्षात घेऊन सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाने नागालँड आणि आसाममधून त्यांचे दोन उच्च अधिकारी मणिपूरला तैनात केले आहेत.
 
यासोबतच मणिपूरच्या कांगपोकपी आणि जिराबाम जिल्ह्यात सीआरपीएफची दोन मुख्यालये स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे.
 
इंफाळमध्ये सीआरपीएफचे मुख्यालय आधीपासूनच आहे.
 
सध्या मणिपूरमध्ये राज्य पोलिसांसह, सीएपीएफ (CAPF) च्या 124 कंपन्या आणि सैन्याची 184 पथके देखील तैनात आहेत.
 
राहुल गांधींची टीका
राहुल गांधींनी प्रकरणावर ट्वीट करत असे लिहिले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाळलेले मौन आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळे मणिपूरला अराजकाकडे ढकलले जात आहे. मणिपूरमध्ये राष्ट्राच्या विचारांवरच अशाप्रकारे हल्ला केला जात असताना भारत शांत राहणार नाही. आम्ही मणिपूरच्या लोकांसोबत उभे आहोत आणि आता शांतता स्थापित करणे हा एकमेव पर्याय आहे.''
 
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या प्रकरणावर ट्वीट करून लिहिले आहे की, ''मणिपुरमध्ये घडलेली घटना अतिशय लज्जास्पद आणि निंदनीय आहे. भारतीय समाजात अशा प्रकारचा किळसवाणा गुन्हा सहन केला जाऊ शकत नाही.
 
मणिपूरची परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे. मी पंतप्रधानांना असे आवाहन करतो की, त्यांनी मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे. या घटनेच्या व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या दोषींवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. भारतात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना स्थान असू नये.''
 
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ''मणिपूरमधून समोर आलेले महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे व्हीडिओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या या भीषण घटनेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. समाजातील हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिला व लहान मुलांना सहन करावा लागतो.''
 
प्रियांका गांधींनी लिहिले की, “मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याकरता आपण सगळ्यांनी पुढे आले पाहिजे आणि एका आवाजात या हिंसाचाराचा निषेध केला पाहिजे. मणिपूरमधील हिंसक घटनांकडे केंद्र सरकार, पंतप्रधान डोळे झाकून का बसले आहेत? असे व्हिडिओ आणि हिंसक घटना त्यांना अस्वस्थ करत नाहीत का?''
 
प्रकरणाची चौकशी सुरू, स्मृती इराणींचं स्पष्टीकरण
हा व्हीडिओ सार्वजनिक झाल्यानंतर केंद्र सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी याप्रकरणावर पंतप्रधाना नरेंद्र मोदींनी पाळलेल्या मौनावर टीका केली आहे.
 
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी रात्री 12 वाजता या मुद्द्यावर ट्विट केले आहे.
 
स्मृती इराणी यांनी लिहिले की, "मणिपूरमधील दोन महिलांवर झालेल्या लैंगिक छळाचा भयानक व्हिडिओ अत्यंत अमानवीय आणि निषेधार्ह आहे. मी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याशी बोलले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले. दोषींना पकडण्यामध्ये कोणतीही कसर सोडली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.''
 
3 मे 2023 रोजी मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये सुरु झालेल्या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत 142 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.
 
या हिंसाचारामुळे राज्यातील तब्बल 60,000 लोक बेघर झाले आहेत.
 
राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार या हिंसाचारात जाळपोळीच्या 5000 घटना घडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच दाखल केलेल्या अहवालात मणिपूर सरकारने म्हटले आहे की हिंसाचाराशी संबंधित एकूण 5,995 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत आणि 6,745 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
Published By- Priya dixit