मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (08:36 IST)

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना

train
जगभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. चीनसह दक्षिण कोरिया, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झाले आहे. केंद्राकडून राज्यांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनेबाबत एक पत्र देखील पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासन देखील सतर्क झाले असून, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
दरम्यान, नाताळची सुट्टी व थर्टीफस्टमुळे रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रवासामध्ये तोंडाला मास्क लावावा, सुरक्षित अंतर ठेवावे, प्रवासामध्ये सॅनिटायजरचा वापर करावा, अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिल्या जात आहेत. थर्टीफस्ट आणि नाताळमुळे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांच्या प्रतिक्षा यादीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
 
प्रवासी सिझनमुळे सध्या मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. इतर गाड्यांना रेखील आरक्षणासाठी मोठी प्रतिक्षा यादी आहे. परिणामी अनेक जण वेटिंगचे तिकीट काढून खाली बसून प्रवास करणे पसंत करत आहेत. जनरल डब्यांमध्ये, तर पाय ठेवायला देखील जागा मिळत नाही. आरक्षितसह जनरल डब्यांमध्ये बहुतांश प्रवासी मास्क लावणे टाळतांना दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांनी मास्क वापरावे. प्रवासात सुरक्षित अंतराचे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत.