1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (15:15 IST)

मध्य रेल्वेला सर्वसामान्य प्रवाशांबद्दल ना प्रेम राहिलंय, ना आपुलकी राहिलीये.- जितेंद्र आव्हाड

jitendra awhad
साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा लागत आहे. ठाणे आणि बदलापूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. साध्या लोकल रद्द केल्यामुळे गर्दी वाढल्याचा दावा देखील प्रवाशांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एसी लोकलला मुंबईतील इतर भागांतही विरोध होऊ लागला असून त्यासंदर्भात भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर इशारा दिला आहे. विधानभवनात एका वृत्तवाहिनी शी बोलताना आव्हाडांनी एसी लोकलच्या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केलं आहे.
 
नेमकं घडलं काय?
काही दिवसांपूर्वी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आक्रमक होत आंदोलन केलं. साध्या लोकल रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे हे प्रवासी आक्रमक झाले होते. या प्रवाशांनी कळवा कारशेडमधून सुटणारी एसी लोकल अडवून ठेवली. आधी यावेळी सुटणारी ही लोकल साधी होती. यातून हे प्रवासी प्रवास करत होते.
 
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं आहे. “मध्य रेल्वेला सर्वसामान्य प्रवाशांबद्दल ना प्रेम राहिलंय, ना आपुलकी राहिलीये. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून येणारं उत्पन्न हे देशभरात सर्वाधिक आहे. त्याच्यावर देशात अनेक रेल्वे पोसल्या जातात. आता त्यांनाच तुम्ही अडचणीत आणत आहात. तुम्ही साध्या लोकल रद्द केल्या आणि त्याजागी तुम्ही एसी टाकत आहात”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.