शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (23:26 IST)

फक्त ३ सेकंदात सत्यता पडताळून रेल्वे प्रवासासाठी मासिक पास व प्रमाणपत्र देणार

१५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यासाठी सामान्य नागरिकांना जवळच्या रेल्वे स्थानकात त्यांनी लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, सोबत आधारकार्ड, ओळखपत्र सादर केल्यास तेथील पालिका कर्मचारी त्यांना प्राप्त लिंकच्या आधारे फक्त ३ सेकंदात त्याची सत्यता पडताळून रेल्वे प्रवास करण्यासाठी मासिक पास व प्रमाणपत्र देतील. त्या आधारेच त्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता गर्दी टाळण्यासाठी सामान्य नागरिकांना अगदी लसीचा १ डोस घेतला असेल तरी कोणत्याही परिस्थितीत रेल्वेची तिकिटे देण्यात येणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी , नागरिक यांनाच पूर्वीप्रमाणे रेल्वे तिकीट देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
 
तसेच, मुंबईतील ५३ रेल्वे स्थानकात ३५८ खिडक्यांवर व मुंबई बाहेरील एमएमआर रिजनमधील ५० रेल्वे स्थानकतील खिडक्यांवर तेथील पालिका कर्मचारी लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे मासिक पास देतील. यासंदर्भातील प्रक्रिया सकाळी ७ पासून ते रात्री ११ पर्यन्त दोन सत्रांत करण्यात येणार आहे.
 
सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी आवश्यक रेल्वे पास, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सध्या तरी ‘क्यूआर कोड’ ची भानगड ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे क्युआर कोडचा विषय राहिलेलाच नाही. परवानगीची प्रक्रिया ही अगदी सुटसुटीत व सुलभ प्रक्रिया असणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.
 
रेल्वे प्रवासासाठी जर कोणी लसीचे २ डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे सिद्ध झाल्यास त्या दोषी व्यक्तीवर नियमाने पोलिसांमार्फत फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.