शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (19:13 IST)

शाळा 17 ऑगस्टपासून सुरू होणार, काय आहेत नियम?

महाविद्यालयांनंतर आता राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.
 
शाळा सुरू करण्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील परंतु अंतिम निर्णय स्थानिक प्रशासन घेणार.
 
17 ऑगस्टपासून राज्यातील 8 वी ते 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
 
यासंदर्भातील एसओपी शिक्षण विभाग जाहीर केली आहे. यातील निकषांचे पालन करुनच शाळा सुरू करता येणार आहेत.
 
शहरी भागांमध्ये 8 वी ते 12 वी शाळा सुरू होणार असून, ग्रामीण भागात ज्या ठिकाणी 15 जुलैपासून 8 ते 12 वी शाळा सुरू आहेत, तिथे 5 वी ते 8 वीचे वर्गही सुरू केले जाणार आहेत.
 
नियमावलीनुसार-
 
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे शहरात वर्ग सुरू करण्याबाबत पालिका आयुक्त निर्णय घेणार.
नगरपंचायत, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर निर्णयासाठी चार सदस्यीय समिती निर्णय घेणार. जिल्हाधिकारी समितीचे प्रमुख असतील.
शाळा सुरू करण्याआधी कमीतकमी एक महिना शहरात-गावात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असावा.
शिक्षकांचं लसीकरण होणं आवश्यक, गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये.
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, 15-20 विद्यार्थी एका वर्गात, दोन बाकांमध्ये 6 फुटांच अंतर
शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्यात बोलावण्यात यावं.
मुलांमध्ये आढळणारा MIS-C हा आजार किती काळजीचा?
लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
मुंबईतली मुलं तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत का?
मात्र, रुग्णसंख्या जास्त असलेल्या (रेड झोन) भागात शाळा सुरू करता येणार नाहीत, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यायची आहे.
 
ज्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत, त्या ठिकाणी रुग्णसंख्येचा आढावा घेऊन शाळा सुरू होतील, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, "पालक आणि लोकप्रतिनिधींनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जात आहे. यासाठी एक समिती स्थापन केली जाईल जी स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करेल."
 
5 जुलै रोजी काय निर्णय झाला होता?
गेल्या महिन्यात 5 जुलै रोजी सरकारनं शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार, कोव्हिड-मुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली गेली होती.
 
कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून राज्यातील शाळा बंद असून टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत सरकारकडून अनेकदा नियमावली जाहीर करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता काही अंशी सुरू झालेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
 
आता राज्यात लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल केल्यानंतर केवळ कोव्हिड-मुक्त भागातील शाळा सुरू करता येऊ शकतात असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना काही निकषांच्या आधारे शाळा सुरू करता येणार आहेत.
 
शाळा सुरू करण्याचे 5 जुलै रोजी काय निकष सांगितले होते?
1. कोव्हिड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांशी चर्चा करुन ठराव करावा.
 
2. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. प्राधान्याचे विषय ठरवून वेळापत्रक तयार करण्यात यावे.
3. एका बेंचवर केवळ एकच विद्यार्थी बसू शकतो. तसंच एका वर्गात एकावेळी केवळ 15-20 विद्यार्थी बसू शकतील.
 
4. दोन बेंचमध्ये किमान सहा फूटाचे अंतर हवे.
 
5. प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे.
 
6. शाळेतील शिक्षकांच्या राहण्याची सोय गावात करावी. शिक्षकांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करावा लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.
 
7. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी.
 
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?
राज्य सरकारने आपल्या शासन निर्णयामध्ये पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत काही सूचना केल्या आहेत.
 
1. आजारी असललेल्या आणि कोरोनाची लक्षणं असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नये.
 
2. कुटुंबातील व्यक्तींनी नियमितपणे वाफ घ्यावी तसंच इतर दक्षता घ्यावी.
 
3. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे.