शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (21:55 IST)

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष देसाई

देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही वातावरणामुळे अनेक गुंतवणुकदार पुढे येत आहेत. देशातील सर्वाधिक परदेशी गुंतवणुक ही आपल्या राज्यात होते. त्यामुळे राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत 25 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून रु.15 हजार कोटी रुपयांची  गुंतवणूक राज्यात होणार आहे, या माध्यमातून 30 हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
व्यापार केंद्र मुंबईतच होणार
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशात येणाऱ्या बहुतांश गुंतवणूकदारांची पसंती ही मुंबईला आहे. इथे दोन शेअर बाजाराच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होत असते. या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार केंद्र म्हणून मुंबई ही योग्य आहे हे कोणीही आर्थिक तज्ज्ञ सांगेल. गुजरात येथे केंद्र शासनाच्या मान्यतेने केंद्र सुरु झालेले असले, तरी लवकरच शासन मुंबई येथे व्यापार केंद्र उभारेल, असेही श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.