सोमवार, 4 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (20:25 IST)

नाशिक मराठी साहित्य संमेलन: 'भाषा एकमेकांना जोडणारा दुवा व्हावी, एकमेकांना तोडणारी भिंत नाही'-जावेद अख्तर

"भाषा एकमेकांना जोडणारा दुवा व्हावी, एकमेकांना तोडणारी भिंत नाही, भाषा ही एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करणारी भिंत बनली नाही पाहिजे," असं मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केलं.
"जावेद अख्तर हे नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले की सुरुवातीला मला वाटलं की मी तर मराठी भाषेचा साहित्यिक नाही मग हे निमंत्रण स्वीकारावं की नाही.
"पण मला हे कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा आहे की जसे मराठी साहित्यिक, कवी दराबारामध्ये असत तसे उर्दू शायरही दरबारात असत. तसाच मी देखील आज मराठीच्या दरबारात हजर झालो आहे.
"भाषा ही एकमेकांना जोडणारा दुवा असली पाहिजे पण गंमत अशी आहे की आज या भाषांमुळेच एकमेकांमध्ये दुराव्याच्या भिंती निर्माण होत आहेत, असे व्हायला नको," असं अख्तर म्हणाले.
"मी पहिल्यांदा जेव्हा विजय तेंडुलकरांचं शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक पाहिलं तेव्हा मला कुणीतरी झापड मारली असा भास झाला. इतकं ते प्रभावी होतं आणि आपल्याला या लेखकाला बद्दल माहिती नव्हतं याची मला लाज देखील वाटली.
"संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव हे मराठीचे सर्वांत मोठे साहित्यिक आहेत कारण त्यांनी सर्वांना समजेल अशा भाषेतच आपलं साहित्य लिहिलं. त्यांनी आपलं तत्त्वज्ञान झाडलं नाही तर लोकांशी संवाद साधला," असं अख्तर म्हणाले.
 
जयंत नारळीकरांवर निशाणा
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष जयंत नारळीकर अनुपस्थित राहिल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नाही हे मी समजू शकतो पण जर ते किमान एक तास जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर सर्व रसिकांना आनंद झाला असता. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.
"शेकडो लोक आपल्याला पाहायला आले ही बाब लक्षात ठेऊन ते आले असते तर रसिकांना आनंदच झाला असता. जर भविष्यात अशी परिस्थिती ओढावली तरी दुसरा अध्यक्ष निवडण्यात यावा अशी तरतूद मंडळाच्या घटनेत असावी," असं मत ठाले पाटील यांनी व्यक्त केलं.
संमेलनासाठी हिंडता फिरता अध्यक्ष निवडला पाहिजे असं देखील ते म्हणाले.
 
शरणकुमार लिंबाळेंवर टीका
कौतिकराव ठाले पाटील यांनी ज्येष्ठ लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्यावर टीका करताना आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.
ठाले पाटील म्हणाले, "लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन या कादंबरीला सरस्वती सन्मान मिळाला होता. इतर लेखकांचे सत्कारावर सत्कार होतात पण आपली वर्तमानपत्रांनी दखल घेतली नाही अशी नाराजी लिंबाळे यांनी व्यक्त केली होती. पण आपले लेखन हेच आपले सामर्थ्य आहे हे ओळखावे. जर आपल्या कादंबरीची दखल कुणी घेतली नसेल तर त्याबद्दल आत्मचिंतन करावे."
 
जयंत नारळीकरांची अनुपस्थिती
नाशिकमध्ये कुसुमाग्रज नगरीमध्ये हा 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी हा सोहळा होणार आहे.
 
कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या गर्जा जयजयकार या गीताने उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ, गीतकार जावेद अख्तर आणि साहित्यिक विश्वास पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर आणि मावळत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे अनुपस्थित आहेत.
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये होत आहे. या संमेलनाला तुम्हाला जर नाशिकला जायला जमणार नसेल, तरी हरकत नाही.
 
या ठिकाणी पाहू शकता संमेलन
तुम्हाला घरबसल्या साहित्य संमेलन पाहता येऊ शकतं. सोशल मीडियावरून साहित्य संमलेनाबद्दलची माहिती, सगळे अपडेट पाहता येतील.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्युब अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर साहित्य संमेलनातील कार्यक्रम पाहता येतील.
यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आहेत. पण, प्रकृती अस्वस्थतेमुळे ते प्रत्यक्षरित्या संमेलनात उपस्थित राहू शकणार नाहीयेत.
डॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे.
महाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना 2010 साली 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
भारत सरकारने डॉ. जयंत नारळीकर यांना 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' या नागरी पुरस्काराने गौरवलं आहे. तसंच, स्मिथ्स प्राईज, अॅडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानेही डॉ. नारळीकरांचा गौरव झाला आहे.
 
डॉ. जयंत नारळीकर कोण आहेत?
19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म झाला.
डॉ. नारळीकरांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे वाराणसीच्या हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई सुमती या संस्कृत अभ्यासक होत्या. नारळीकरांचे प्राथमिक शिक्षण वाराणसीतच झाले. त्यांचे उच्चशिक्षण ब्रिटनस्थित केंब्रिज विद्यापीठात झाले.
1972 साली डॉ. नारळीकर भारतात परतले आणि TIFR मध्ये खगोलशास्त्र विभागात प्रमुखपदी विराजमान झाले. पुढे 1988 साली त्यांची आयुका संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली.
'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी'साठी डॉ. जयंत नारळीकर जगभरात ओळखले जातात. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन केलं.
संशोधनासोबतच विज्ञानविषयक लेखन त्यांनी सुरू ठेवलं. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, वामन परत न आला, यक्षांची देणगी, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या.
'यक्षांची देणगी' या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे.
आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप, विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप यांसारखी विज्ञानविषयक माहिती देणारी पुस्तकंही त्यांनी लिहिली.
'चार नगरांतले माझे विश्व' ही त्यांची आत्मकथा असून, डॉ. विजया वाड यांनी 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर' हे चरित्र लिहिले आहे.