बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (15:43 IST)

नाशिक जिल्ह्यातील 'या' ठिकाणी सापडली विश्वातील नाविन्यपूर्ण वनस्पती

सटाणा तालुक्यातील साल्हेर परिसरात विश्वातील नाविन्यपूर्ण वनस्पती सापडली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), साठ्ये कॉलेज आणि कॅमरिनो विद्यापीठ यांच्यावतीने पश्चिम घाटात करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
 
बीएनएचएसचे कॉन्झर्व्हेशन ऑफिसर हर्षल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा अभ्यास केला. त्यात साठ्ये कॉलेजचे मुख्य वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ सुशांत मोरे आणि इटलीच्या कॅमरिनो विद्यापीठाचे संशोधक फॅबिओ कोन्टी यांचा समावेश होता. या पथकाने पश्चिम घाटात विविध ठिकाणी संशोधन केले. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर परिसराच्या उत्तरेला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेला एका नाविन्यपूर्ण वनस्पतीचा त्यांना शोध लागला आहे. या वनस्पतीचे नाव इकिनोप्स सह्याद्रीकस (असे आहे. ही वनस्पती केवळ पश्चिम घाटाच्या उत्तर भागातच सापडते. या वनस्पतीच्या शोधासंबंधीचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल असलेल्या नोर्डिक जर्नल ऑफ बॉटनी मध्ये प्रसिद्ध झाला आहे. उत्तर पश्चिम घाटाच्या पठारी भागातील स्थानिक जैवविविधता असा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. या संशोधनासाठी मुंबईच्या बृहद भारतीय समाज संस्थेच्या श्रीपाद हळबे यांनी निधी उपलब्ध करुन दिला. पश्चिम घाट हा गुजरातच्या डांग जिल्ह्यापासून थेट केरळपर्यंत आहे.
 
इकिनोप्स सह्याद्रीकस ही वनस्पती केवळ डोंगर उतारावरच आढळते. पांढऱ्या रंगाची फुले आणि टोकाला या फुलांमुळे चेंडू सारखा तयार होणारा आकार हे या वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या संस्थेने या वनस्पतीला सध्या ‘कमीत कमी चिंता’ या गटात टाकले आहे. सध्या तरी ही वनस्पती धोक्यात असल्याचे संकेत नाहीत. मात्र, रस्त्यासह विविध प्रकारच्या विकास प्रकल्पांचा या वनस्पतीला फटका बसू शकतो, असे आययुसीएनने म्हटले आहे.