मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (15:44 IST)

मराठा आरक्षणावर येत्या १५ जुलै अंतरीम सुनावणी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी संपली असून आता अंतरिम आदेश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने येत्या १५ जुलै रोजीची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या विरोधकांना आणि समर्थकांना देखील १५ जुलैपर्यंत आदेशांसाठी थांबावं लागणार आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतलं असून आता न्यायालयाने वकिलांना त्यांचे मुद्दे लेखी सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. मात्र, सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकरणाचा निकाल देणं शक्य नाही, अशी भूमिका मांडत न्यायालयाने प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यावर निकाल देऊ अशी भूमिका देखील स्पष्ट केली. त्या पार्श्वभूमीवर किमान वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी अंतरिम आदेश देण्यासाठी १५ जुलै रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. याआधी गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेताना मिळणाऱ्या आरक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.