उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकरांना अयोध्येचे निमंत्रण
अयोध्येच्या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. याशिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले जाणार आहे. राम जन्मभूमी न्यासाने ज्या निमंत्रण पत्रिका कुरिअर केल्या आहेत, त्यामध्ये या सर्व नेत्यांची नावे आहेत.
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी देशातल्या सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रणे दिली जाणार आहेत. यामध्ये आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रण पाठवले गेल्याची माहिती आहे. यासोबतच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ््याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि कळवले जाईल, असे सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान आहेत. कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. ट्रस्टने सुमारे 6 हजार लोकांना निमंत्रण पत्रे पाठवली आहेत. राम जन्मभूमीच्या सोहळ््याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देण्यात आले नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर ठाकरे गटाकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती. राज ठाकरेंनीही आपल्याला निमंत्रण आले नसल्याचे म्हटले होते. आता या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या ठिकाणी जाणार हा हे पाहावे लागेल.
संत, महंत, सेलिब्रिटींनाही निमंत्रण
अयोध्येत २२ जानेवारीला होणा-या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ््यासाठी मुंबईतून निमंत्रण असलेल्या व्हीव्हीआयपीची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील संत-महंत, राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष, खेळाडू, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती काही महत्त्वाचे सेलिब्रिटीज यांना निमंत्रण दिले जाणार आहे.
पवार अयोध्येला जाणार नाहीत
राम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे का आणि आले तर काय करणार असा प्रश्न गुरुवारी शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार यांनी राम मंदिराच्या निर्मितीवर मी समाधानी आहे. देव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो. माझ्याही एक दोन ठिकाणी श्रद्धा आहेत, त्या ठिकाणी मी जात असतो. मला अद्याप अयोध्येचे आमंत्रण आले नाही आणि आले तर मी जाणार नाही. अशा प्रकारे धर्माच्या आधारे राजकारण करणे योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले.
Edited by -Ratnadeep Ranshoor