सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (11:45 IST)

शरद पवार यांची सध्याची भूमिका संभ्रमात टाकणारी की आरपारच्या लढाईची? - दृष्टिकोन

प्रा. प्रकाश पवार
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
 
भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला ढवळून काढण्याची कार्यक्षमता शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आजही आहे. ही वस्तुस्थिती असली तरीही महाराष्ट्राचे राजकारण सैरभैर झाले आहे.
 
हे वर्णन सर्व पक्षांना लागू आहे. तसेच सर्व नेत्यांना आणि मतदारांनाही लागू होते. एवढेच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया हा देखील सैरभैर या प्रकारचा आहे.
 
यामुळे राजकीय पक्ष, राजकीय नेते, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यांना सातत्याने असे वाटत राहिले आहे की, शरद पवार यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असते.
 
शरद पवारांची वैचारिक भूमिका घसरडी आहे. हे एक लोकप्रिय कथन (Narrative) आहे. त्यामुळे शरद पवार कोणत्या विचारप्रणाली आणि आघाडी बरोबर आहेत? हा यक्षप्रश्न ठरू लागला आहे.
 
हा प्रश्न फार अवघड नाही. परंतु हा प्रश्न समजून घेण्याचा संदर्भ शरद पवारांच्या इतिहासाशी जोडला जातो. हा प्रश्न शरद पवारांच्या इतिहासाशी जोडण्याऐवजी आजच्या काळातील वास्तवाशी जोडून पाहिला तर या अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर मिळते.
 
ते म्हणजे, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व अस्तित्वभान घटत चालले आहे, परंतु हिंदू अस्तित्वभान सर्व दूर पसरलेले आहे. तळागाळात देखील हिंदू अस्तित्वभान स्वीकारले गेले आहे.
 
यामुळे भाजप पक्षाचा वैचारिक आधार देखील सैरभैर झालेला आहे. याचे भान शरद पवारांना आहे. यामुळे शरद पवारांना हिंदुत्व अस्तित्वभान आणि हिंदू अस्तित्वभान अशी एक पोकळी दिसत आहे. ही एक नव्याने संघटन करण्याची संधी आहे. या गोष्टीचे भान शरद पवारांना आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बहुजन हिंदुत्व आणि भाजपचे समरसता हिंदुत्व अशी वैचारिक क्षेत्रात फटाफूट झाली आहे. उद्धव ठाकरे बहुजन हिंदुत्व या चौकटीच्या बाहेर येऊन केवळ हिंदू अस्तित्वभानाच्या चौकटीत राजकीय संघटन करतात.
 
या पातळीवर काँग्रेस पक्ष देखील राजकीय संघटन करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतली होती. यामुळे खरे तर महाविकास आघाडी उदयास आली होती. त्या आघाडीला महाविकास आघाडी असे म्हणण्यापेक्षा हिंदू अस्तित्वभान असलेली महाविकास आघाडी संबोधने योग्य होते.
 
हा मुद्दा अजित पवार यांनी समजून घेतला नाही. अजित पवार यांचे आकलन महाविकास आघाडी म्हणजे हिंदुत्व चौकटीतील महाविकास आघाडी असे होते. यामुळे अजित पवार यांना भाजपकडे आकृष्ट करण्यात देवेंद्र फडणवीसंना यश आले.
 
हाच मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या बद्दलचा होता. यातून मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे की हिंदुत्व अस्तित्वभान आणि हिंदू अस्तित्वभान यांची सरमिसळ झालेली वेगवेगळी करणे हा खरा शरद पवार यांच्या पुढील मुख्य मुद्दा आहे.
 
त्यामुळे शरद पवार दूध आणि पाणी वेगवेगळे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे काम नाजूक आहे. एक काम कौशल्याचे आहे. या कामांमध्ये जोखीम पत्करावी लागते. ही जोखीम जशी राहुल गांधींनी पत्करली आहे, तशीच ती शरद पवार यांनी देखील पत्करले आहे.
 
मध्यमवर्ग ही शरद पवारांसमोरची समस्या?
शरद पवारांच्या पुढे मध्यमवर्ग ही एक मोठी समस्या आहे. मध्यमवर्गाचा संकल्पना हिंदुत्व केंद्रित आहेत. मध्यमवर्ग 'इंडिया' या आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा सरळ समर्थक होऊ शकत नाही. मध्यम वर्गाचा भक्कम पाठिंबा भाजपला आहे. हाच एक मोठा पेचप्रसंग सध्याच्या इंडिया किंवा महाविकास आघाडीच्या राजकारणा पुढील आहे.
 
मध्यमवर्ग पाठीमागे किती घरे सरकू शकतो. याचे शरद पवारांचे म्हणून एक आकलन दिसते. त्यांच्या आकलनानुसार मध्यमवर्ग हिंदुत्वापासून जास्तीत जास्त हिंदू अस्तित्वभाना पर्यंतचा उलट प्रवास करू शकतो. यामुळे हिंदू या ओळखीला सहिष्णु, सर्वसमावेशक, सकलजनवादी, विज्ञाननिष्ठ स्वरूप देण्याचा विचार त्यांचा आहे. या कारणामुळे त्यांची भूमिका मध्यम मार्गी स्वरूपाची झाली आहे.
 
जन (People) आणि अभिजन (Elite) असा वाद खूपच टोकदार झाला आहे, याचे आत्मभान शरद पवारांना आहे.‌ या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अभिजन या चौकटीत अडकत चालली होती.
 
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची चौकट अभिजन म्हणून निश्चित केली होती. परंतु भाजपाचा सामाजिक पाया सैल होण्यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस मधील अभिजन गटाबरोबर आघाडी केली.
 
अशीच प्रक्रिया शिवसेनेच्या संदर्भात घडलेली होती. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट हा एका अर्थाने अभिजन आहे. यामुळे नवीन राजकीय प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू झाली. भाजप या पक्षाची नवीन ओळख अभिजन म्हणून पुढे आली.‌
 
भाजपने अभिजन या गटांबरोबर आघाडी केली. यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष अभिजनांचे पक्ष ठरले. तर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षातील राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गट हे लोकांचे पक्ष म्हणून पुढे आले आहेत.
 
यामुळे अभिजन एका बाजूला आणि लोक दुसऱ्या बाजूला असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात सत्ता, संपत्ती, अधिकार आणि प्रतिष्ठा अभिजनांच्या बाजूला आहे. सध्या तरी लोकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी सत्ता, संपत्ती, अधिकार आणि प्रतिष्ठा यांचा उपयोग होत नाही. या गोष्टीचे आत्मभान शरद पवार यांना आहे.
 
यामुळे दुसरा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अभिजनांपासून लोकांना वेगळे कसे काढावयाचे. तसेच लोकांचे संघटन अभिजनांच्या विरोधी करताना त्यांना ताकद कशी पुरवावयाची. स्थानिक पातळीवरील आणि राष्ट्रीय पातळीवरील सत्ता लोकांच्या विरोधात गेलेली आहे.
 
संवादाचे न कापलेले दोर
आजच्या काळात सत्ता ही लोकांची ताकद नाही. त्यामुळे अजित पवार आणि दिल्लीतील काँग्रेस बरोबर चर्चा आणि वाटाघाटीचा एक मार्ग खुला ठेवलेला दिसतो. खरे तर याच कात्रजचा घाट असे म्हणणे योग्य ठरेल.
 
शरद पवार यांनी जनांची किंवा अभिजनांची अशी एक बाजू कधीच घेतलेली नाही. शरद पवार जनांमधले काही मुद्दे आणि अभिजनांमधील काही मुद्दे यांचा समन्वय घडविण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत.
 
याउलट उद्धव ठाकरे यांची शिवसेना सरळ सरळ कोणतीतरी एक बाजू घेत आलेली आहे. भूमिपुत्र या संकल्पनेत त्यांनी जनांची बाजू घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही सरळपणे आजही जनांची बाजू घेते. तर शरद पवार यांचा प्रयत्न जन आणि प्रस्थापित हितसंबंध यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
प्रस्थापित हितसंबंधी गटातून काही पाठिंबा मिळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शरद पवार भाजपच्या नियंत्रणाखाली गेलेल्या काही प्रस्थापित हितसंबंधी गटांबरोबर आणि नेतृत्वाबरोबर चर्चा आणि वाटाघाटी करताना दिसतात. यामुळे शरद पवार शिवसेनेपासून काही अंतर राखून असलेले हे दिसतात.
 
तसेच भाजपच्या नियंत्रणाखाली गेलेल्या नेत्यांची त्यांचा संवाद सुरू आहे. त्यांनी त्यांच्याबरोबर असलेला संवादाचे दोर कापून टाकलेले नाहीत. उद्धव ठाकरे, संजय राऊत, सामना वृत्तपत्र, इतर वृत्तपत्रे, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना मात्र शरद पवार यांनी भाजपच्या नियंत्रणाखाली केलेल्या नेत्यांबरोबरचे संवादाचे दोर कापून टाकावेत असे वाटते. तर शरद पवार यांना लोकांमधून आणि अभिजनांमधून काही ताकद मिळते. हा मुख्य फरक लक्षात घेतला पाहिजे.
 
शरद पवार आणि लालू प्रसाद यांचा भाजपविरोध
महाराष्ट्राच्या राजकारणाची वस्तुस्थिती सैरभैर प्रकारची का झाले? इतर राज्यांची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो.
 
शरद पवार यांच्या समोर ही परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती बिहारमध्ये आहे. नितिश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यापुढेही सैरभैर परिस्थिती होती. अखिलेश यादव आणि मायावती यांच्यापुढे देखील असेच सैरभैर परिस्थिती आहे. महाराष्ट्र, बिहार, आणि उत्तर प्रदेशाप्रमाणे काश्मीरची ही राजकीय परिस्थिती सैरभैर या प्रकारचीच आहे.
 
अरविंद केजरीवाल यांच्या पुढील राजकीय परिस्थिती सैरभैर या प्रकारची आहे. यामुळे शरद पवार सरधोपट आणि नितिश कुमार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, मायावती, अरविंद केजरीवाल मात्र परिस्थितीचे निश्चित आकलन करत आहेत अशी वस्तुस्थिती दिसत नाही. या प्रत्येक नेत्यांच्या भूमिकेमध्ये लवचिकपणा दिसतो.
 
परंतु तरीही शरद पवार आणि लालूप्रसाद यादव या दोन नेत्यांच्या भूमिका सातत्याने भाजप विरोधी राहिलेले आहेत. या दोन नेत्यांनी सरळ व उघडपणे भाजप बरोबर गेल्या वीस वर्षात युती किंवा आघाडी केलेली नाही. यामुळे भारतीय राजकारणातील या दोन नेत्यांची भूमिका भाजप विरोधाचीच दिसते.
 
हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर शरद पवार यांनी पुन्हा पुन्हा नोंदविली आहे. यामुळे नव्याने उदयास आलेल्या इंडिया या आघाडीच्या पुढे शरद पवारांच्यामुळे फार मोठे प्रश्न निर्माण होत नाहीत.
 
तसेच महाविकास आघाडीच्या समोर सुरुवातीपासून सैरभैर राजकारणाचा प्रश्न उभा होता. उलट शरद पवारांच्या आधी काँग्रेस या प्रक्रियेमधून गेली आहे. कारण काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्ष नेते झालेले राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी जुळवून घेतले होते. या दोन पक्षांच्या सैरभैर राजकीय वर्तनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही प्रक्रिया घडली आहे.
 
पक्षनिष्ठा-तत्त्वनिष्ठा : इंडिया आघाडीसमोरील प्रश्न
पक्षनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा या दोन्ही गोष्टींचा ऱ्हास साटेलोटे भांडवलशाहीने (Casino Capitalism) घडवला आहे. ही प्रक्रिया जागतिक स्वरूपाची आहे. या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्रावरती व भारतातील इतर घटक राज्यांवरती देखील झाला आहे. तसेच या प्रक्रियेचा परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इतरही प्रादेशिक पक्षांवर झाला आहे. कोण जात्यात आहे, तर कोण सुपात आहे, एवढाच त्यामधील फरकाचा मुद्दा शिल्लक राहिला आहे.
 
यामुळे इंडिया या आघाडीचा खरा संघर्ष स्वतःशी प्रथम आहे. कारण पक्षनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा या गोष्टीचा प्रयोग पक्षामध्ये अस्तित्वासाठी राबविला पाहिजे.
 
गेल्या वीस वर्षात इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी साटेलोटे भांडवलशाहीची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ताबडतोब जनसेवा व लोकसेवा हे सूत्र वापरले जाईल अशी शक्यता फार कमी आहे. हा मुद्दा शरद पवारांच्या समोर यक्षप्रश्न म्हणून उभा आहे तसाच तो इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या पुढे यक्षप्रश्न म्हणून उभा आहे.
 
इंडिया आघाडी समोरील आणि शरद पवार यांच्या समोरील परिस्थितीची चर्चा नियम म्हणून करणे सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे. नियमापेक्षा नीती महत्त्वाचे आहे. सूक्ष्मदृष्टी महत्त्वाची आहे.
 
आजच्या परिस्थितीमध्ये समाविष्ट असलेले बारीकसारी घटकही समजून घेता आले पाहिजेत. त्यांचे सम्यक आकलन असले पाहिजे. तरच उद्भवलेल्या अडचणीचे किंवा समस्येचे निराकरण करता येणे शक्य आहे. याला नितिनाम सूक्ष्मा दृष्टी असे म्हणतात.
 
पक्षाने काय करावे, पक्षाने काय करू नये, नेतृत्वाने काय करावे, काय करू नये, माणसाने काय करावे, काय करू नये, मतदारांनी काय करावे काय करू नये हे धर्म सांगतो. परंतु नियम व्यापक असतात. नियमांना अपवाद असतात. अपवादात्मक परिस्थिती ओळखून या नियमांना वळसा घालून पुढे जाण्याची मर्मदृष्टी (Inside) असावी लागते. या गोष्टीला नीती म्हणून ओळखले जाते.
 
परंतु मुख्य मुद्दा असे आकलन असणारी व्यक्ती अपवादात्मक नीतीचा उपयोग स्वतःच्या पक्ष स्वार्थासाठी करणार नाही हे कशावरून ठरवावे. तसेच स्वतःच्या सत्ताकांक्षी लालसे साठी करणार नाही, हे कशावरून ठरवावे. हा पुन्हा एक यक्षप्रश्न भारतीय राजकारणात उभा राहिला आहे.
 
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या सर्वात कमी जागा होत्या. त्या पक्षाला महाविकास आघाडीत सामील होत आले. महाविकास आघाडीत राहून काँग्रेस पक्षाला त्यांच्या मतदारांचे काही हित साध्य करता आले. हा मुद्दा देखील नीती म्हणजे शुद्ध बुद्धी (नितिनामचमला प्रज्ञा) असे सुचविणारा आहे.
 
थोडक्यात सकलजनांचे हित, मतदारांचे हित, राष्ट्राचे हित, राज्याचे हित म्हणजेच नीतीची संकल्पना होय. ही संकल्पना इंडिया आघाडीची आहे, असे आकलन आकाराला आले आहे. परंतु शरद पवार या पद्धतीने नीतीचा अवलंब करतात की नाही हा राजकीय चर्चाविश्वातील महत्त्वाचा यक्षप्रश्न आहे.
 
शरद पवार यांच्याकडे राजकीय समस्येवरील उत्तरे चौकटी बाहेरील (Out of Box) असतात. याचे कारण पुन्हा त्यांचे परिस्थितीचे आकलन हेच आहे. शरद पवार यांनी सध्याच्या परिस्थितीत हे ओळखलेले दिसते की लोक हीच अंतिम ताकद आहे. तसेच त्यांनी हेही ओळखलेले दिसते की नव्याने लोकांचे व तरुणांचे संघटन केले पाहिजे. नव्याने संघटित होणारे लोक आणि तरुण यांच्याकडे संसाधने कमीत कमी आहेत.
 
हा मुद्दा अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना नीटनेटका समजलेला असावा. त्यामुळे खरे तर चर्चा शरद पवार यांच्या संभ्रम अवस्था या गोष्टीवर होण्याऐवजी शरद पवार आणि इतर यांच्यामध्ये उदयास आलेल्या आखाड्यात कोणाची सरशी होईल, हा चर्चेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हाच खरा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा केवळ सत्ता संघर्ष नव्हे तर मूल्यसंघर्ष आहे.
 
(प्रा. प्रकाश पवार हे राज्यशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक असून, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. लेखातील विचार हे लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)