सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2023 (08:58 IST)

त्या मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, भुजबळ यांचा संतप्त सवाल

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, जवाहलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले आहे. यावर राज्याचे मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.  त्या मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत होते.
 
छगन भुजबळ म्हणाले की, संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट आहे. खरे म्हणजे तो मनोहर भिडे. त्याच्यावर आम्हीही एक केस दाखल केली आहे. आमच्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल हे जे काही विधान आहे, त्यावर आमची केस आहे. पण कोर्टात ती केस पुढे पुढे ढकलली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोर्टात गेलो. तारीखच लागत नाही. शेवटी काय सरकार फक्त केस करणार. पण केस केल्यावर ती पटकन वर आली पाहिजे. पण तारखावर तारखा पडत असतात. मला कधी कधी वाटतं त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही तेच समजत नाही. त्या मनोहर भिड्यांचं, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी भिडे गुरूंजीवर निशाणा साधला.
 
अशा लोकांवर कडक कारवाई करा
महात्मा फुलेंवर ते टीका करतात, पण महात्मा गांधींवरही ते टीका करतात. ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ टीका करतात. माझी खात्री आहे, पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शाह असतील कुणालाही ते आवडणार नाही. महात्मा गांधींवरील टीका कुणीही सहन करणार नाही. महात्मा गांधींना आज अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो. क्वचित एखादा देश असेल तिथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. जिथे तिथे महात्मा गांधींच्या विचारसरणीला मानलं जातं. आपलसं केलं जातं. अन् इकडे महात्मा गांधींवर गलिच्छ स्वरुपाच्या टीका केल्या जातात. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.
 
स्तुती नको, पण टीका तरी का?
आता पंडित नेहरूंबद्दल बोलले. नेहरूंचे देशासाठी काडीचंही योगदान नाही असं म्हणतात. अरे त्यांचे वडील देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. सर्व दिले त्यांनी या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. स्वत: साडे अकरा वर्ष नेहरु तुरंगात राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळेल की नाही हे तेव्हा माहीत नव्हत. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल. फार फार त्यांची भलामण करू नका. त्यांची स्तुती करू नका. पण असले काही तरी आरोप करू नका. मला तरी ते आवडत नाही आणि पसंत नाही, असे ही भुजबळ म्हणाले.
 
भुजबळ - केसरकर 
नाशिकमध्ये या, देवाचा धावा करा आणि आमची धरणे पूर्ण भरून द्या
कोल्हापूरच्या  राधानगरी धरणातू पाण्याचा विसर्ग करण्यात आला, परंतु असे करूनही अनेक गावे पाण्याखाली गेली नाहीत. याबाबत बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर  अजब वक्तव्य करताना म्हटले की, मी शिर्डीत  देवाकडे प्रार्थना केल्यामुळे राधानगरी धरणातून पाणी सोडल्यावर एक फूट पण पाण्याची पातळी वाढली नाही. निसर्गात पण देव आहे, असं वक्तव्य त्यांनी नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले. दरम्यान केसरकरांच्या याच वक्तव्याला भुजबळांनी आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले की, नाशिकमध्ये या, देवाचा धावा करा आणि आमची धरणे पूर्ण भरून द्या. 
 
छगन भुजबळ उपहासात्मकपणे म्हणाले की, शिर्डीत साईबाबाच्या दर्शनानंतर कोल्हापुरातील पूरस्थिती निवळली असेल तर दिपक केसरकर यांनी आमच्या नाशिकला यावे आणि  देवाचा धावा करावा आणि आमची धरणे भरून द्यावी. दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी दिपक केसरकरांना नाशिकसाठी देवाचा धावा करा असे आवाहन केले .
 
Edited By - Ratnadeep ranshoor