सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (08:16 IST)

राज्यात पावसाचा जोर घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. मोसमी पावसासाठी पोषक असलेली ही स्थिती हळूहळू क्षीण होत आहे. त्यामुळे राज्यात  पावसाचा जोर घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी  मुंबईसह कोकणात बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरसह काही भागांत, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला, अमरावती आदी भागांत हलक्या सरींची नोंद झाली. पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत १८, १९ सप्टेंबरला हलका पाऊस असेल.