कट कमिशन’मुळे वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये
सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापलेय. यावरून विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान या टीकांना आज भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच शिवसेना आणि आदित्य ठाकरे, आणि एकूण महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. कट कमिशनमुळे फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचं म्हणत शेलारांनी महाविकास आघाडी सरकारकडे संशयाची सुई दाखवली.
वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पाला कसलेही परवानगी किंवा संमती पत्र मिळाले नाही तरी पेंग्विन सेना प्रमुख स्वत: म्हणतं असतील की आम्ही हा प्रकल्प आणला तर प्रत्यक्ष काम का नाही झाले? याचा अर्थ प्रकल्पाच्या सर्व चर्चांनंतर प्रत्यक्ष कारवायांमध्ये या अंतरात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अशी कोणतरी गोष्ट झाली ज्यामुळे प्रकल्प आणणाऱ्याने प्रकल्प गुजरातला नेला. प्रकल्पासंदर्भात महाविकास आघाडी सरकारमध्ये मधल्या काळात असं काय झालं… वाटाघाटी झाली, साठेमारी झाली, कट कमिशन झालं, मागणी झाली नेमक काय झालं. असं म्हणत शेलारांनी हा प्रकल्प गुजरातला जाण्यामागे महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.