शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (09:11 IST)

राज्यात ३१ जनावरांचा बळी घेतला असून २,१५६ जनावरे बाधित

पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झालेल्या जनावरांमधील लम्पी त्वचारोगाने पशुधनावर मोठे विघ्न आले आहे. राज्यात ३१ जनावरांचा बळी घेतला असून २,१५६ जनावरे बाधित झालेली आहेत. अन्य जिल्ह्यांमध्ये याचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत.
 
काय केल्या उपाययोजना?
राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित.
जनावरांचे सर्व बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी.
पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी प्रादुर्भाव झालेल्या गावापासून ५ किमी परिघातील क्षेत्रामध्ये लसीकरण.बाहेरून जनावरे खरेदी करून आणण्यास बंदी.
 
प्राण्यांपासून संक्रमित होत नाही
हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी ठरते.लम्पीचे शेळ्या-मेंढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या-मेढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवात संक्रमित होत नाही. देशीपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता अधिक.
 
कुठून कुठे पसरला?
राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पीची लागण झाली. त्यानंतर हा राेग झपाट्याने अहमदनगर, धुळे, अकोलासह पुणे, काेल्हापूर, सातारा, सांगली व साेलापूर या जिल्ह्यांमध्येही झपाट्याने पसरला.