रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (15:10 IST)

मुंबईमध्ये मुजोर टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करणे आता प्रवाशांना झाले सोप्पे

मुंबईमध्ये आता भाड्याला नकार देण्याबरोबरच मनमानी कारभार करणाऱ्या काळी पिवळी, मोबाईल ॲप आधारित मुजोर टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करणे प्रवाशांना आता सोप्पे होणार आहे. दक्षिण मुंबईत चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी ताडदेव आरटीओने ९०७६२०१०१० हा मदत क्रमांक उपलब्ध केला आहे. या क्रमांकावर केलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन दोषी चालकावर वाहन परवाना किंवा अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी गुरुवार, १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे.
 
प्रवाशांच्या मदतीसाठी ताडदेव आरटीओने तीन अधिकाऱ्याचे विशेष पथक तैनात केले आहे. त्या पथकाला एका वाहनासोबतच संपर्क साधण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्या आली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ९०७६२०१०१० हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून प्रवाशांना त्यावर टॅक्सीचालकांविरोधात तक्रार करता येईल. प्रवाशांना रात्री प्रवासादरम्यान समस्या भेडसावल्यास [email protected] या ई-मेलवरही पुराव्यानिशी तक्रार दाखल करता येईल.
 
प्रवाशांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधी मोबाइलवर संपर्क साधून किंवा व्हॉटसअपवर संदेश पाठवून, तसेच केवळ लघुसंदेश पाठवून तक्रार करता येईल. पुराव्यानिशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर टॅक्सीचालकाला नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात येणार आहे. तक्रार निवारणसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला असून दोषी चालकावर परवाना किंवा अनुज्ञप्ती निलंबनाची किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.