सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (07:40 IST)

मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार

Deepak Vasant Kesarkar
मलबार हिल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. अशावेळी रहिवाशांच्या वाहनांना पार्किंग करू दिले जात नाही. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण देखील होते, अशी रहिवाशांची तक्रार आहे. वाहतूक विभागाने या समस्येवर उपाययोजना करून रहिवाशांना दिलासा द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्ड मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, फेरीवाले, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, अन्न धान्य पुरवठा आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
मंत्री श्री. केसरकर यांनी ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्ड मधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या.
 
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार
 
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील नागरिकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध देण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने मुंबईतील समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार आहेत. त्यांच्यासाठी ‘डे केअर’ सेंटर सुरू करण्याचे नियोजन असून त्यांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल.
 
मुंबईतील प्रामुख्याने अनधिकृत फेरीवाले, कचऱ्याची समस्या, इमारतींमधील अत्यावश्यक सुविधा आदी विषयांबाबत रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्याचे आदेश पालकमंत्री श्री.केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बचत गटांच्या सदस्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात यावे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जावी याबाबतही त्यांनी निर्देश दिले. ज्येष्ठ नागरिकांना दुकानावरून अन्नधान्य आणणे शक्य होत नाही. याकरिता अन्न धान्य वाटप करण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य सेविकांना मानधन कमी आहे, ते वाढविण्याच्या मागणीबाबत बोलताना याविषयी प्रशासकांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
 
या सुसंवाद कार्यक्रमात २४३ रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor