मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (17:22 IST)

वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील

वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आजही सरकारने २० हजार कोटींच्यावर पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यापूर्वी मांडलेल्या पुरवणी मागण्यांचा विनियोग सरकारने केलेला नसतानाही पुन्हा नवीन पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने आधीच अनेक विभागांच्या खर्चाला कात्री लावली आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांचा खर्च सभागृहात मांडावा, अशी मागणी पाटील यांनी आज विधानभवनाबाहेर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.
 
विधान परिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना आ. हेमंत टकले यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, कॉ. माधवराव गायकवाड, उमेशाताई पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अटलजींच्या जनसंघातील कामगिरीचा तसेच पंतप्रधापदी असताना त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत टकल यांनी त्यांना अभिवादन केले.
 
कॉ. माधवराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, गायकवाड यांची कारकीर्द ही मनमाड विभागात मोठ्या प्रमाणावर झाली. पहिले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले. त्यांचा सगळ्यात मोठा लढा हा शेतकाऱ्यांसाठी होता. परंतू अशा सामान्यांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणाऱ्या नेत्याला मृत्यूनंतर देखील न्याय मिळत नाही, ही खंत व्यक्त करतानाच माधवराव गायकवाड यांच्या नावाने गरीब विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याची मागणी टकले यांनी केली.