सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादी काँग्रेस आता परिवर्तन यात्रा काढणार - पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आणि संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन यात्रा काढणार आहे... राज्याची आजची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यात बदल घडवून आणण्यासाठी ही परिवर्तन यात्रा असेल. १० जानेवारीला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन यात्रा सुरू होईल. महाडच्या क्रांतीभूमित पहिली सभा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. ज्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली, त्यांच्या पत्नीला आणि मुलाला पोलिसांनी डांबून ठेवलं. महाराष्ट्रात कधीच नव्हतं, असं वातावरण आज पाहायला मिळतं आहे. कांदा पिकवणारा शेतकरी रोज रडतोय. सरकारने एसीमधून बाहेर पडावं. चढ्या दराने कांदाखरेदी करावी, अशी आमची मागणी आहे. तुटपुंजी मदत जाहीर करून सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय, अशी टीकाही पाटील यांनी केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार  यांनी या वेळी सरकारला अनेक बोचरे सवाल केले. सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांनी हैदोस घातलाय. वाट्टेल ते बोललं जातंय. सरकार आजही नोटबंदीचं समर्थन करतं. पण आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात की, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था बिघडली. मग खरं कुणाचं? काल मंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीपुढे शेतकऱ्यांनी टॉमेटो फेकले. दुधाला ५ रुपये अनुदान देतो म्हणाले, ते अजूनही मिळालेलं नाही. कामं करायची नाहीत, तर हे सरकार घोषणा तरी कशाला करतं, असा अजितदादा म्हणाले.
 
या वेळी झालेल्या पक्षांतर्गत बैठकीतही अजितदादांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. पाच राज्यांतल्या निवडणुकांतून स्पष्ट होतंय की, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत सरकारबद्दल नाराजी आहे. निराधार महिलांना मदत मिळालेली नाही आणि सरकार कोटीच्या कोटी रुपयांच्या गप्पा मारतंय. या परिस्थितीत परिवर्तन गरजेचं आहे. त्यामुळे ही परिवर्तन यात्रा काढून सरकारची चुकीची धोरणं जनतेसमोर मांडायची आहेत, असं अजितदादा म्हणाले.