बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2023 (12:04 IST)

कसबा-चिंचवड पोटनिवडणूक: कसब्यातून रवींद्र धंगेकर, चिंचवडमधून अश्विनी जगतापांची आघाडी

पुण्यातील कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
 
कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत.
 
तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांनीही पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे.
 
या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पार पडलं होतं.
 
कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली.
 
या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी जोर लावल्याचं दिसून आलं. तसंच चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
 
कसबा : चौदाव्या फेरीपर्यंतची आकडेवारी
रवींद्र धंगेकर - 48986
 
हेमंत रासने - 44165
 
काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर 4 हजार 700 मतांनी आघाडीवर
 
चिंचवड : अकराव्या फेरीपर्यंतची आकडेवारी
अश्विनी जगताप - 35228
 
नाना काटे - 27794
 
राहुल कलाटे - 10669
 
भाजप उमेदवार अश्विनी जगताप 8554 मतांनी आघाडीवर
 
कसबा आणि चिंचवडमधला प्रचार का वैशिष्ट्यपूर्ण ठरला?
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे विधानसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या. त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.
 
कसबा आणि चिंचवड हे दोन मतदारसंघ भाजपच्या हातात होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीनेही उमेदवार दिले होते.
 
कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. तर चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी मिळाली.
 
या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पाहायला मिळाले.
 
“महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांमधले मोठे नेते प्रचारात पाहायला मिळाले. शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांसारखे सहभागी झाले. भाजपकडून मोठे नेते प्रचारात होते. पण त्याचसोबत भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावलेली दिसून आली. प्रभागांमध्ये त्यांनी नगरसेवकांवर जबाबदारी दिली. राज्यस्तरीय नेते जसे की देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे नेते सक्रीय होते. गिरिश महाजन आणि रविंद्र पाटील या हे ग्राऊंड लेवलवर काम करताना दिसले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार-पाच दिवस चिंचवड आणि पुण्यातच होते. याचसोबत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सात आठ दिवस मुक्कामी राहिले. रात्रंदिवस बैठका घेतल्या जात होत्या. यामुळे गेल्या पन्नास वर्षात कसब्याची निवडणूक चुरशीची झाली,” असं दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे चिफ रिपोर्टर ज्ञानेश्वर बिजले यांनी सांगितलं.
 
याचसोबत आजारी असलेले गिरिश बापटही पाहायला मिळाले. यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली.
 
कसबा-चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवारांना सहानुभूतीचा फायदा मिळेल?
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होते आहे. चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली.
 
पण कसब्यात तसं झालं नाही. मुक्ता टिळक यांच्या कुटूंबात तिकीट दिलं गेलं नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यावर टिळक कुटूंबातून नाराजीसुद्धा पाहायला मिळाली. आमदारांच्या निधनामुळे लोकांची सहानुभूती भाजपच्या उमेदवाराला फायदेशीर ठरेल का हा एक प्रश्न आहे.
 
विश्लेषकांच्या मते चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांना सहानुभूतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकेल. पण कसब्यात मात्र सहानुभूती हा मुद्दा आता मागे पडला आहे.
 
दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं की, “विद्यमान आमदारांच्या निधनानंतरची पोटनिवडणूकीत सहानुभुती फॅक्टर मोठा असतो. पुण्यात कसबा आणि चिंचवड या पोटनिवढणुका त्या अनुषंगाने नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. भाजपने त्या अनुषंगाने प्रयत्नही केला की ही निवडणूक बिनविरोध व्हावी.
 
"पण मागच्या काही पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीच. एकंदरीत सध्या राज्यातलं जे वातावरण बघितलं तर स्वतःच्या पक्षाची ताकद तपासून बघण्याची गरज सगळ्यांना वाटली असेल. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. राज्यात सत्तांतर झाले.
 
"महाविकास आघाडीचं सरकार गेलं. शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते आहे. यामुळे सहानुभुतीचा मुद्दा या निवडणुकीत सुरुवातीपासूनत मागे पडला.
 
"चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांना ती कदाचित ती मिळेल. पण कसब्यात तसं चित्र नाही. सहानुभुती असती तर भाजपला ज्या पद्धतीने कसब्यात ताकद लावावी लागत आहे ती लावावी लागली नसती,” दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.
 
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांचे निकाल महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाचे ठरतील?
कसबा आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये येतात. यामुळे या पोटनिवडणुकांच्या निकालाचा परिणाम महापालिका निवडणुकांमध्येही दिसू शकतो, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं. यासाठी अजून बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
 
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळात कधीही जाहीर होऊ शकतात. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पण काम करतेय. पण ही निवडणूक जिंकणं काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीसोबत जर पुणे पालिकेत सत्तेत यायचं असेल तर ही निवडणूक महत्त्वाची ठरेल.
 
महापालिका जिंकण्यासाठी पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं मानसिक बळ वाढवायचं असेल तर ही निवडणूक जिंकणं महत्त्वाचे ठरेल. चिंचवडची पोटनिवडणूक अश्विनी जगताप यांच्यासाठी काहीशी सोपी आहे. पण तरिही तिथे राष्ट्रवादीने त्यांची ताकद पणाला लावली आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच हे केलं असावं,” असं दैनिक पुढारीचे प्रतिनीधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.