गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (07:28 IST)

आ.आव्हाडांच्या कृत्याबद्दल खा.सुप्रियाताई, चाकणकर गप्प का

jitendra awhad
भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांचा सवाल
राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा.सुप्रियाताई सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
 
श्रीमती रशीद म्हणाल्या की, ठाण्यात रविवारी झालेल्या फ्लायओव्हरच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रण असल्यामुळे मी तेथे गेले होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी बाजूला थांबले होते. मुख्यमंत्री वाहनातून निघाले असताना मी त्यांना भेटण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी मला सरळ-सरळ बाजूच्या पुरुषांच्या गर्दीत ढकलून दिले. ढकलून देत असताना, ‘तू इथे काय करते आहेस,’ असे ते म्हणाले. या घटनेबाबत आपण पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाला आहे. या घटनेची ध्वनिचित्रफित सर्वत्र प्रसारित झाली असून त्यात आव्हाड यांनी मला कोणत्या पद्धतीने ढकलले हे स्पष्टपणे दिसते आहे.
 
राष्ट्रवादीच्या खा.सुप्रियाताई सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराच्या या कृत्याबाबत अजूनही चकार शब्द उच्चारलेला नाही. माझ्या तक्रारीबाबत पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, एवढेच माझे म्हणणे आहे, असेही श्रीमती रशीद यांनी नमूद केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor