पाडकामाची पाहणी करायला किरीट सोमय्या हे काय म्हाडाचे मुकादम आहेत का --- अनिल परब
शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. ज्या कार्यालयाचं पाडकाम करण्यात आलं त्यासमोरच आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तसंच पाडकामाची पाहणी करायला किरीट सोमय्या हे काय म्हाडाचे मुकादम आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार टीका केली.
म्हाडा वसहतीमधील ज्या कार्यालयाचं पाडकाम करण्यात आलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या येणार होते. पण त्यांना मुंबई पोलिसांनी बीकेसीमध्ये रोखलं आहे. तर अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये, त्यांना इथं येऊ देत. शिवसैनिक आपल्या स्टाइलनं त्यांचं स्वागत करतील, असा इशारा दिला आहे.
अनिल परब काय म्हणाले?
"जे कार्यालय पाडण्यात आलं आहे ते माझं कार्यालय आहे असं सोमय्यांकडून भासवण्यात येत आहे. माझा जन्म याच म्हाडाच्या वसाहतीमध्ये झाला आहे. लहानपणापासून मी इथं राहतोय. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर वसाहतीमधील रहिवाशांनीच वसाहतीमध्ये आपलीच सोसायटीची जागा आहे. तिथं कार्यालय सुरू करावं असा आग्रह धरला होता. काही जणांनी कार्यालयाविरोधात तक्रारी दिल्या होत्या. पण यावर आता म्हाडा कोणताही अधिकार राहिलेला नाही हे आम्ही पटवून दिलं. त्यानंतर कारवाई मागे घेत असल्याची नोटीसही म्हाडाकडून देण्यात आली होती. ही जागा रेग्युलराइज करण्यासाठीचा अर्ज आम्ही म्हाडाकडे दाखल केला होता. पण म्हाडाकडून असं करता येणार नाही असं उत्तर देण्यात आलं आहे. अखेर आम्ही सोसायटीनंच निर्णय घेत हे कार्यालय पाडलं आहे", अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
Edited By - Ratnadeep Ranshoor