सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (12:26 IST)

‘अधिकाऱ्यांना फोन करा’ हा तर बनावट संदेश : महावितरण

bijali
कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी, हातकणंगलेसह काही भागात नागरिकांना वीज बिल भरण्यासंदर्भाने बनावट ‘एसएमएस’ प्राप्त झाल्याचे समजते. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा’, अशा आशयाचे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना वेगवेगळ्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावरून प्राप्त आहेत. वीजग्राहकांनी अशा बनावट संदेशाना प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येते आहे.
 
महावितरणकडून वीजग्राहकांना प्रणालीद्वारे केवळ नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा संदेशक (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. महावितरणकडून अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही.
 
महावितरणकडून वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठवा, मीटर रिडींग तारीख व वापर वीज युनिट संख्या, वीजबिल रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडितची नोटीस इ. माहिती पाठविण्यात येते.
 
वीजग्राहकांनी बनावट संदेशातील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधणे, वीज बिल भरण्यासाठी लिंक पाठविली असल्यास त्यावर क्लिक करणे टाळावे, अन्यथा आर्थिक फसवणूक होऊ शकते. आपल्या शंका व तक्रारी करीता २४ तास सुरु असलेल्या १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे महावितरणचे आवाहन आहे.