1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (10:20 IST)

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार?; वाढत्या मागणीनंतर निर्णय होण्याची शक्यता?

konkan railway
कोकणातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 
या संदर्भात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने निवेदन दिले आहे. दरम्यान, वाढत्या मागणीमुळे आता लवकरच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहे.  
 
दरम्यान कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 14जानेवारी रोजी परळ स्थित सेंट्रल रेल्वे वर्कशॉपसमोरील भावसार सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार असून या कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात यावे या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे.
 
या संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी देखील मागणी केली होती. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करून कोकण रेल्वे स्वतंत्र झोन केला तरच केंद्रीय बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करून पायाभूत सुविधांची निर्मिती होवू शकते. असे राऊत म्हणाले होते.
 
सध्या कोकण रेल्वेला पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी अंदाजे 35 हजार कोटी रुपयांची गरज आहे. पण तेवढा निधी कोकण रेल्वे महामंडळाकडे नाही, असे देखील विनायक राऊत म्हणाले होते.
 
भारतीय रेल्वेच्या नऊ विभागामध्ये दहावा विभाग कोकण रेल्वेचा स्वतंत्र कोकण झोन असा करण्यात यावा आणि भारतीय रेल्वेकडून कोकण रेल्वेला विविध सुविधा पुरविण्यात याव्या, अशी मागणी राऊत यांनी या पूर्वी केली आहे.
 
कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना ही 1990 मध्ये बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर करण्यात आली होती. कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासाठी मुंबई उपनगरातील 22 प्रवासी संघटनांचा पाठिंबा आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor