1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Ladki Bahin Scheme Hike to 2,100 per installment

लाडकी बहीण योजना: हप्त्यात २१०० रुपयांपर्यंत वाढ? व्हायरल शासन निर्णयामागील नक्की सत्य काय?

मुंबई: महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राबवली जात असून, याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी आणि कथित शासन निर्णय (GR) प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, आता महिलांना १५०० रुपयांऐवजी थेट २१०० रुपये दिले जाणार आहेत.
 
काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दावा पूर्णपणे खोटा आणि निव्वळ अफवा आहे. शासन निर्णय जारी करून हप्त्याची रक्कम २१०० रुपये करण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे.
 
 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार असल्याची बातमी किंवा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शासन निर्णय अफवा व असत्य आहे.
 
याआधीही लाडकी बहीण योजनेची रक्कम १८०० रुपये होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, ज्यावर शासनाने विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. आता पुन्हा एकदा २१०० रुपये मिळण्याबाबतचा चुकीचा दावा पसरवला जात आहे.
 
सरकारचे आवाहन: 
योजनेच्या रक्कमेत असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि या संदर्भात कोणताही अधिकृत शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांनी आणि नागरिकांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या अशा कोणत्याही अफवांवर किंवा बनावट मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या योजनेअंतर्गत आधीप्रमाणेच दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत.
पुढील लेख
महाराष्ट्रावर भयानक जलसंकट: धरणांवर पोलिसांचा पहारा; १६ ऑक्टोबरपासून राज्यभरात १०% पाणीकपात!